झेंडेंना हवंय म्हाडाचं घरं, गोरेगावसह दादरपर्यंत भरले १० अर्ज

दो रुपये भी बहुत बडी चीज होती है बाबू, असं म्हणत विक्रांत सरंमजामेसारख्या उद्योगपतीला आपल्या प्रेमात पाडणारी इशा आणि त्याचवेळी या दोघांच्या प्रेमातील व्हिलन म्हणजे झेंडे सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहचले आहेत. या तीन पात्रांनी प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली अाहे. सध्या मराठी मालिकांमध्ये सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून तुला पाहते रे नावलौकिक मिळवताना दिसत आहे.

 याच मालिकेत ३ हजार कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीत काम करणारे आणि अलिशान गाड्यांमधून फिरणारे झेंडे अर्थात उमेश जगताप आता म्हाडाच्या घरासाठी आपलं नशीब अजमावत आहेत. उमेश जगताप यांनी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घराच्या लाॅटरीसाठी एक-दोन नव्हे तब्बल १० अर्ज भरले अाहेत. हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच आशा असल्याची प्रतिक्रिया उमेश जगताप यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.

२००५ पासून अर्ज

का रे दुरावा या मालिकेतून उमेश जगताप प्रेक्षकांच्या परिचयाचे झाले. तर त्यानंतरच्या तुझं माझं ब्रेकअपमधील वकिलांच्या भूमिकेत ते दिसले आणि ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. पण खऱ्या अर्थानं उमेश जगताप यांना लोकप्रियता मिळाली, ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले ते तुला पाहते रे मधील झेंडे या व्यक्तिरेखेमुळे. उमेश जगताप गेल्या १५ वर्षांपासून गोरेगावमध्ये भाड्याच्या घरात राहत असून मुंबईत हक्काचं घर असावं हेच सध्या त्यांचं मोठं स्वप्न आहे. त्यामुळेच त्यांनी खासगी बिल्डरएेवजी म्हाडाचा पर्याय निवडला आहे. म्हणूनच गेल्या तेरा वर्षांपासून २००५ पासून त्यांनी चार वेळेस म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आहे. पण अजून त्यांना लाॅटरी काही लागली नाही. 

मुग्धा, सुशांतचा अर्ज

लाॅटरी लागली नाही म्हणून झेंडे अर्थात उमेश जगताप निराश झालेले नसून यंदाच्या लाॅटरीत त्यांनी स्वत:च्या नावानं उच्च उत्पन्न गटात ७ तर बायकोच्या नावानं ३ अर्ज भरले आहेत. उमेश जगतापबरोबरच गायक हृषीकेश जोशी आणि बिग बाॅस फेम सुशांत शेलार यांनीही उच्च गटातील घरांसाठी अर्ज केले आहेत. तर लिटल चॅम्प म्हणून ओळख मिळवलेल्या मुग्धा वैशंपायननेही अर्ज केला अाहे.  हृषीकेश जोशीने पवईतील घरासाठी तर सुशांत शेलारने प्रतिक्षानगरमधील घरासाठी अर्ज केला आहे. ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांचा भाऊ सुदेश मांजरेकर, निलम शिर्के यासह अनेक कलाकरांनीही अर्ज केला आहे. 

सेलिब्रिटीही आकर्षित

म्हाडाच्या माध्यमातून अनेक कलाकारांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. परवडणाऱ्या दरात म्हाडाची घर मिळत असल्यानं सेलिब्रिटीही म्हाडाकडे दरवर्षी आकर्षित होतात. त्यानुसार यंदाही कलाकारांची मांदियाळी म्हाडा लाॅटरीत नशीब अजमावणार आहेत.


हेही वाचा - 

म्हाडा लाॅटरी : ग्रँट रोडमधील कोट्यावधींच्या ३ घरांसाठी १३६ अर्ज

म्हाडाच्या घरांसाठी १ लाख ६४ हजार अर्ज; एका घरामागे ११८ दावेदार


पुढील बातमी
इतर बातम्या