Advertisement

म्हाडाच्या घरांसाठी १ लाख ६४ हजार अर्ज; एका घरामागे ११८ दावेदार

५ नोव्हेंबरपासून मुंबई मंडळाच्या १३८४ घरांच्या लाॅटरीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरूवात झाली. त्यानुसार नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत सोमवारी, १० डिसेंबरला रात्री १२ वाजता संपली आहे. या मुदतीत मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्यादृष्टीनं १ लाख ६४ हजार ४२४ जणांनी लाॅटरीत सहभाग घेतला आहे.

म्हाडाच्या घरांसाठी १ लाख ६४ हजार अर्ज;  एका घरामागे ११८ दावेदार
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १३८४ घरांच्या लाॅटरीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया अखेर सोमवारी १० डिसेंबरला रात्री १२ वाजता पूर्ण झाली आहे. त्यानुसार १ लाख ५१ हजार ५३२ इच्छुकांनी नोंदणी केली आहे. तर १ लाख ९७ हजार १८३ नोंदणीधारकांनी अर्ज भरले असून अनामत रक्कमेसह १ लाख ६४ हजार ४२४ अर्ज सादर झाले आहेत. १६ डिसेंबरला ही लाॅटरी फुटणार अाहे.   

मुंबई मंडळानं हा प्रतिसाद चांगला असल्याचं म्हटलं असलं तरी घरांच्या तुलनेत अर्जांची संख्या कमीच असल्याचं म्हटलं जात आहे. कारण एका घरामागे २०० ते ३०० दावेदार असायचे. यंदा एका घरामागे ११८ दावेदार असल्याचं चित्र आहे.


प्रारूप यादी १३ डिसेंबरला

५ नोव्हेंबरपासून मुंबई मंडळाच्या १३८४ घरांच्या लाॅटरीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरूवात झाली. त्यानुसार नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीची मुदत सोमवारी, १० डिसेंबरला रात्री १२ वाजता संपली आहे. या मुदतीत मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्यादृष्टीनं १ लाख ६४ हजार ४२४ जणांनी लाॅटरीत सहभाग घेतला आहे.

आता मुंबई मंडळाकडून या अर्जांची छाननी सुरू असून १३ डिसेंबरला, गुरूवारी संध्याकाळी ६ वाजता लाॅटरीत सहभागी होणाऱ्या अर्जदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. यादी प्रसिद्ध झाल्यावर काही चुका असल्यास वा प्रारूप यादीत नाव नसल्यास अर्जदारांना मुंबई मंडळाशी संपर्क साधत आवश्यक ते बदल करून घेता येतील.


अंतिम यादी १५ डिसेंबरला 

 अंतिम यादी १५ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता जाहीर केली जाईल. या यादीत ज्यांची नावं असतील ते सर्व अर्जदार लाॅटरीत सहभागी होतील. तर १६ डिसेंबरला म्हाडा भवनात सकाळी दहा वाजला लाॅटरी फुटण्यास सुरूवात होईल आणि तेव्हाच समजेल की या १ लाख ६४ हजार अर्जदारांमधून कुणाचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 


प्रतिसाद कमी

यंदा मुंबई मंडळानं १३८४ घरं विक्रीसाठी काढली. तर २०१७ मध्ये मुंबई मंडळाच्या ८१९ घरांसाठी  लाॅटरी फुटली होती. यावेळी केवळ ६५ हजार १२६ अर्ज सादर झाले होते. २०१६ मध्ये मुंबई मंडळानं ९७२ घरांसाठी लाॅटरी काढली आणि त्यासाठी १ लाख ३४ हजार अर्ज सादर झाले होते. मुंबईतील घरांच्या लाॅटरीला दहा वर्षांपूर्वी जो प्रतिसाद मिळत होता, त्या तुलनेत गेल्या चार-पाच वर्षात मिळणारा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. कारण अत्यल्प आणि अल्प हा म्हाडाच्या घरांचा खरा ग्राहक. पण गेल्या दोन वर्षात मुंबई मंडळाच्या लाॅटरीत हाच अत्यल्प-अल्प गट दुर्लक्षिला जात आहे. 


अत्यल्पसाठी कमी घरं

 मागील वर्षी अत्यल्प गटासाठी केवळ ८ घरं होती. तर यंदा या गटासाठी केवळ ६३ घरं अाहेत. मध्यम गटासाठी मागच्या वर्षी १९२ घरं होती. तर यंदा हा आकडा वाढून ९२६ वर गेला अाहे. पण अत्यल्प गटासाठी यंदाही घरं जास्त नसल्यानं आणि अनामत रक्कम अधिक असल्यानं अनेक इच्छुक अर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे प्रतिसाद कमी आहे हे तितकंच खरं असल्याचं म्हटलं जात आहे.हेही वाचा - 

म्हाडाच्या अर्जासाठी अनामत रक्कम होणार कमी
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा