Advertisement

म्हाडाच्या अर्जासाठी अनामत रक्कम होणार कमी

म्हाडा प्राधिकरणानं मुंबईतील घरांसाठीच्या अर्जाची अनामत रक्कम कमी करता येईल का वा अनामत रक्कमेला काही पर्याय उपलब्ध करून देता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे.

म्हाडाच्या अर्जासाठी अनामत रक्कम होणार कमी
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लाॅटरीत अर्ज करून हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण लाॅटरीत अर्ज करण्यासाठी भरमसाठ अनामत रक्कम मुंबई मंडळ आकारत असल्याने हजारो इच्छुकांना अर्जच करता येत नाही. त्यामुळं त्याचं घराचं स्वप्न स्वप्नच राहतं.

ही बाब लक्षात घेत आता म्हाडा प्राधिकरणानं मुंबईतील घरांसाठीच्या अर्जाची अनामत रक्कम कमी करता येईल का वा अनामत रक्कमेला काही पर्याय उपलब्ध करून देता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार लवकरच यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात येईल, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. 


अशी असते अनामत 

म्हाडाच्या कोकण मंडळासह इतर मंडळाच्या घरांच्या अर्जांसाठी अनामत रक्कम कमी आहे. अत्यल्प गटासाठी ५ हजार, अल्प गटासाठी १० हजार, मध्यम गटासाठी १५ हजार तर उच्च गटासाठी २० रुपये अशी अनामत रक्कम आहे. त्याचवेळी मुंबई मंडळाच्या घरांच्या अर्जासाठी मात्र भरमसाठ अनामत रक्कम आकारली जाते. अत्यल्प गटासाठी १५ हजार, अल्प गटासाठी २५ हजार, मध्यम गटासाठी ५० हजार तर उच्च गटासाठी ७५ हजार रुपये अशी ही अनामत रक्कम आहे.

ही रक्कम बरीच मोठी आहे. कारण लाॅटरीतील स्पर्धा पाहता एका अर्जावर अर्जदारांना समाधान मानता येत नाही. किमान दोन-तीन अर्ज तर भरावेच अशीच अनेकांची इच्छा असते. पण अनामत रक्कम लक्षात घेता हे अनेकांना शक्यच होत नाही.


म्हाडाकडून कानाडोळा

अल्प गटातील इच्छुकांने चार अर्ज भरायचे म्हटलं तर त्याला एक लाख रूपये हाताशी ठेवावे लागतात. तर अत्यल्प आणि अल्प गटातील घरांसाठीच सर्वाधिक मागणी असताना या गटाला मात्र ही अनामत रक्कम परवडत नाही. त्यामुळे अनामत रक्कम कमी करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून म्हाडाकडे होत आहे. पण म्हाडाकडून या मागणीकडे कानाडोळाच केला जात आहे. आता मात्र म्हाडा अध्यक्षांनी यासाठी पुढाकार घेत अनामत रक्कमेवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही पर्यायही त्यांनी समोर आणले आहेत.


तीन पर्याय

त्यातील एक पर्याय म्हणजे अनामत रक्कम कमी करणं असा अाहे. तर दुसरा पर्याय एका अनामत रक्कमेत एकापेक्षा अधिक अर्ज भरता येतील का असा आहे. तर आणखी एक पर्याय अनामत रक्कम न आकारता केवळ अर्ज शुल्क आकारणे. या पर्यायांमधून कोणता एक पर्याय निवडून कशाप्रकारे इच्छुकांना दिलासा देता येईल याचा विचार म्हाडा प्राधिकरणाकडून सुरू आहे. त्यानुसार म्हाडा प्राधिकरणाच्या येत्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. हा निर्णय झाला तर नक्कीच इच्छुकांना मोठा दिलासा मिळेल असं म्हटलं जात आहे.



हेही वाचा - 

नॅशनल पार्कमधील झोपडीधारक-आदिवासींच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; म्हाडाकडून निविदा जारी

शिवडीचा पुनर्विकास अखेर मार्गी; मुंबई पोर्ट ट्रस्टने तयार केला प्रस्ताव




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा