मुंबई महापालिका (BMC) आणि मध्य रेल्वे (CR) यांनी सायन पूर्व–पश्चिम रेल्वे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी 31 मे 2026 ही अंतिम मुदत ठरवली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये हा शंभर वर्षे जुना पूल बंद झाल्यापासून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सायन रेल्वे पुल बंद झाल्याने पादचारी आणि वाहनधारकांना वळसा घेऊन प्रवास करावा लागतो. परिसरात शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये असल्याने लोकांनी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध नसताना पुल पाडण्यास मोठा विरोध केला होता.
ऑक्टोबरमध्ये मध्य रेल्वेने बांधलेला फुटओव्हर ब्रिज सुरू करण्यात आला. उर्वरित पाडकाम कोणत्याही अडथळ्याविना सुरू ठेवता आले.
अमलबजावणीचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आढावा बैठकमंगळवारी BMC मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी संयुक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभरेंबरोबर तसेच BMC आणि CR च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
सायन पुलाचा रेल्वे हद्दीत येणारा भाग रेल्वे विभागाकडून बांधला जात आहे, तर रस्ते, दोन पादचारी अंडरपास आणि इतर संबंधित कामे महापालिकेकडून केली जात आहेत.
BMC च्या वेळापत्रकानुसार:
लालबहादूर शास्त्री रोडवरील अंडरपास – डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण
धारावी बाजूचा दुसरा अंडरपास – फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत पूर्ण
रेल्वे पुलाच्या उत्तरेकडील भागावर गर्डर लाँचिंग – मार्च 2026 च्या पहिल्या आठवड्यात
दक्षिणेकडील भागावर गर्डर लाँचिंग – एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात
यानंतर रेल्वे हद्दीत येणारी उर्वरित कामे पूर्ण केली जातील.
धारावी आणि LBS रोडकडे जाणारे रस्ते – 15 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण
पूर्वेकडील रस्त्याचे काम – 15 एप्रिल 2026 नंतर सुरू होणार; पूर्ण होण्यासाठी 45 दिवस लागणार
अभिजीत बांगर म्हणाले,
"जर सर्व कामे नियोजनानुसार झाली, तर 31 मे 2026 पर्यंत संपूर्ण पूल पूर्ण होईल आणि 1 जून 2026 पासून वाहतुकीसाठी खुला केला जाईल."
हेही वाचा