पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सिडकोची ४४६६ घरांची लॉटरी बुधवारी जाहीर

पोलिसांसाठी विशेष गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ४४६६ घरांची लॉटरी उद्या बुधवारी जाहीर होणार आहे. नवी मुंबईतील सिडको कार्यालयात बुधवारी दुपारी १२ वाजता संगणकीय सोडत जाहीर करण्यात येणार आहे .

सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता एका विशेष गृहनिर्माण योजनेची सुरूवात २७ जुलै २०२० रोजी करण्यात आली. या योजनेत ४४६६ घरे पोलीस कर्मचार्‍यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता उपलब्ध असणार्‍या या योजनेतील घरं केवळ मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांसाठी राखीव आहेत. यातील १०५७ घरं  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि ३४०९ घरं अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. २७ जुलैपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होऊन सदर योजनेस उत्तम प्रतिसाद लाभला. अर्ज नोंदणी, शुल्क भरणा इत्यादी सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या.

या सोडतीचे https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर वेबकास्टींगच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्याही निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.


हेही वाचा -

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्रतेनं करा- पालिका आयुक्त

मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणी


पुढील बातमी
इतर बातम्या