दादर, माहिमकरांनाही मेट्रो-३ ‘नकोशी’, फूटपाथला भेगा, भिंतींना तडे

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

चर्चगेट, कुलाबा, गिरगाव, मरोळकर, सिद्धार्थ महाविद्यालय, जे. एन. पेटीट, झेवियर्स, सेव्ह आरे, सेव्ह ट्री अशा एक ना अनेक जणांना कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ नकोशी झालेली असताना त्यात दादर-माहिमकरांचीही भर पडली आहे. मेट्रो-३ च्या कामामुळे दादर-माहिमकर हैराण झाले असून त्यांनी मेट्रो-३ चे काम त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच साकडे घालण्यात येणार असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचीही तयारी दादर-माहिमकरांनी दर्शवली आहे.

मशिनची घरघर सोसवेना

मेट्रो-३ च्या खोदकामासाठी भूगर्भात खोदकाम केले जात आहे. त्यासाठी मोठ्या मशिन वापरल्या जात आहेत. या मशिनच्या आवाजामुळे चर्चगेट-कुलाब्यात राहणाऱ्या रहिवाशांपाठोपाठ दादर ते माहिम परिसरातील रहिवासीही हैराण झाले आहेत. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मशिनची सतत घरघर सुरू असल्याने डोकेदुखी वाढली आहे. एकमेकांशी बोलणेही अशक्य झाल्याची माहिती गोखले रोडवरील जगजीवन निवासमधील रहिवासी किशोर मेहता यांनी दिली आहे.

फूटपाथला भेगा, भिंतींना तडे 

गोखले रोड परिसरातील इमारती ५० ते १०० वर्षे जुन्या असून या इमारतींना मेट्रोच्या कामामुळे जोरदार हादरे बसत असल्याची माहिती स्थानिक  रहिवासी सुरेश खांडके यांनी दिली. प्रकाश हाॅटेलजवळील फूटपाथला तर चक्क १० ते १५ फुटांच्या भेगा पडल्या आहेत. परिसरातील इमारतींचे प्लास्टर पडत आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण असल्याचेही खांडके यांनी स्पष्ट केले आहे.

फोन बंद, रस्ते बंद

माहीम परिसरातील काही इमारतींतील दूरध्वनी २९ आॅगस्टपासून बंद आहेत. मेट्रो-३ च्या कामासाठी 'एमएमआरसी'ने मोठे खड्डे खोदले असून या खड्ड्यातूनच दूरध्वनीची लाईन गेली आहे. या खड्ड्यात पाणी साचल्याने दूरध्वनी बंद झाल्याचा दावा येथील रहिवासी गुलाम हुसेन यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे. माहीम परिसरातील फूटपाथ, रस्तेच नव्हे, तर काही मुख्य रस्तेही मेट्रो-३ च्या कामासाठी बंद केले आहेत. त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचेही हुसेन यांनी स्पष्ट केले आहे. 

गर्दुल्ल्यांचे अड्डे

शीतलादेवी ते माहीम दर्गा परिसरातील फूटपाथ बॅरीगेट्स लावून 'एमएमआरसी'ने बंद केले आहेत. या बॅरीगेटसच्या आड रात्री गर्दुल्ल्यांचे अड्डे भरत असल्याचेही गुलाम हुसेन यांनी सांगितले. त्याचा त्रास रहिवाशांना विशेषत महिलांना होत असल्याचे म्हणत गुलाम हुसेन यांनी मेट्रो-३ च्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

मेट्रो-३ मुळे रहिवाशांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होत आहेच, पण इमारतींनाही हादरे बसत असल्याने तडे जात आहेत. यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एेरणीवर आला आहे. तर इमारत कोसळण्याची शक्यताही दाट झाल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे आम्हाला मेट्रो-३ नकोय, मेट्रो-३ चे काम त्वरीत बंद करा, अशी आमची मागणी असून यासंबंधीचे पत्र दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. तर या मागणीकडे कानाडोळा केल्यास दादर आणि माहिममधील रहिवाशी रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला विरोध करतील.

- गुलाम हुसेन, रहिवासी, माहीम


हेही वाचा -

मेट्रो- ३ च्या कामाची कृपा... चर्चगेटमधील रहिवाशांना केमिकलयुक्त पाणी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

पुढील बातमी
इतर बातम्या