Advertisement

मेट्रो-3मुळे नुकसान झालं तर कॉन्ट्रॅक्टर जबाबदार, एमएमआरसीने केले हात वर!


मेट्रो-3मुळे नुकसान झालं तर कॉन्ट्रॅक्टर जबाबदार, एमएमआरसीने केले हात वर!
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्गातील टनेलिंगच्या (भुयारी काम) कामाला सुरूवात होणार असून, या कामाच्या वेळी आसपासच्या एखाद्या इमारतीला तडा गेला वा इमारत कोसळली तर त्याची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ची असणार नाही, तर ही जबाबदारी सर्वस्वी कंत्राटदाराची असणार आहे अशी माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी नुकतीच दिली आहे. 

मात्र, हात वर करणाऱ्या एमएमआरसीच्या या भूमिकेने चांगलीच खळबळ उडाली असून मेट्रो-3 च्या 50 मीटरच्या क्षेत्रातील रहिवासी पुरते धास्तावले आहेत. 'मेट्रो-3 आता आमच्या मुळावर उठली आहे,' असे म्हणत रहिवाशांना आता काय करावे? असा प्रश्न पडला आहे.

दक्षिण मुंबईत, त्यातही गिरगाव-काळबादेवीसारख्या परिसरात मोठ्या संख्येने धोकादायक, अतिधोकादायक इमारती आहेत. अशावेळी मेट्रो-3 दक्षिण मुंबईतील गिरगाव-काळबादेवी, मुंबई सेंट्रल, दादर, शितलादेवा, माहिम अशा परिसरातून पुढे सिप्झला जाणार आहेत. पुढे माहिम ते सिप्झदरम्यानही धोकादायक इमारती असण्यची दाट शक्यता आहे. दरम्यान, एमएमआरसीकडून 2014-15 मध्ये मेट्रो-3 मार्गावर दोन्ही बाजूने 50 मीटरच्या आतील इमारतींच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार 1435 इमारती या संवेदनशील इमारती म्हणून जाहीर करण्यात आल्या असून त्यांची वर्गवारीही ठरवण्यात आली आहे.


वर्ग
स्वरुप
इमारतींची संख्या
पहिला वर्ग
अतिसंवेदनशील (अतिधोकादायक)
16
दुसरा वर्ग
मध्यम
247
तिसरा वर्ग
कमी अधिक प्रमाणात संवेदनशील
405
चौथा वर्ग
कमी संवेदनशील
469
पाचवा वर्ग
कमी संवेदनशील
184
उर्वरीत
नगण्य संवेदनशील
11


या ऑडिटनुसार टनेलिंग करताना 1435 इमारतींना धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातही हे ऑडिट 2014-15 मध्ये झाल्याने आता धोकायदाक-अतिधोकादायक इमारतींची संख्या आणखी वाढली असणार आहे. असे असताना टनेलिंगचे काम करताना इमारत कोसळण्याची, इमारतीला नुकसान पोहोचण्याची आणि त्याहीपेक्षा म्हणजे जिवित हानी होण्याची शक्यता आहे. तर याच भितीने रहिवाशी घाबरले असताना आता एमएमआरसीने आपली जबाबदार कंत्राटदाराव ढकलत रहिवाशांची भिती आणखी वाढवली आहे.

टनेलिंगसाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, यंत्रणा आणि मशिन अत्यंत सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत असल्याचा दावा भिडे यांनी केला आहे. तर कामाच्या वेळेस बांधकामांना धक्का बसणार नाही याची काळजी घेणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले आहे.

जमिनीखाली अत्यंत खोल जाऊन भल्या मोठ्या मशिनने खोदकाम करताना व्हायब्रेशन होणार आणि परिणामी बांधकामाला धक्का बसणारच असा दावा मेट्रो-3 च्या 50 मीटरच्या परिसरातील रहिवाशी आणि स्ट्रक्चरल इंजिनियर जमदेश सुखडवाला यांनी केला आहे. त्यामुळे अशावेळी एखादी दुर्घटना घडून जीवित हानी झाल्यास कंत्राटदाराला पकडायचे का? असा सवालही त्यांनी केला आहे. प्रकल्प एमएमआरसीचा आहे, प्रकल्पाचे मालक एमएमआरसी आहे. त्यामुळे ही जबाबदारीही एमएमआरसीचीच आहे. ही जबाबदारी एमएमआरसीने उचलावी आणि रहिवाशांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी सुखडवाला यांनी केली आहे.


गिरगाव-काळबादेवीतील रहिवाशी एकवटणार

गिरगाव-काळबादेवी परिसरातील रहिवाशीही आता चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळेच यापुढची दिशा ठरवण्यासाठी गुरूवारी आमच्या परिसरातील रहिवाशांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पांडुरंग सकपाळ, विभाग प्रमुख


मेट्रो-3 मध्ये प्रत्येक गोष्ट ही कायदा धाब्यावर ठेवूनच होत आहे, याचे हे आणखी एक उदाहरण. मरोळमधील माझ्या घराच्या खालून मेट्रो जात आहे. माझ्या घराचा सर्व्हेही झाला आहे. माझ्या घराला या कामामुळे जर काही धक्का बसला तर मी कंत्राटदाराला शोधत जायचे का? याचे उत्तर एमएमआरसीने द्यावे.

अॅड. गॉडफ्रे पिमेंटा, अध्यक्ष, वॉचडॉग फाऊंडेशन


8 दिवस हॉटेलमध्ये संसार

टनेलिंगच्या काम जिथे सुरू असेल, त्या भागातील रहिवाशांचे 8 दिवस तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे स्थलांतर हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे, हे याआधीच एमएमआरसीने जाहीर केले आहे. त्यामुळे टनेलिंगच्या कामादरम्यान जिवितहानीच्या होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे.


कोर्टात धाव घेणार?

एमएमआरसीने करारामध्ये ही जबाबदारी कंत्राटदारावर टाकली आहे. पण कंत्राटदारावर किती विश्वास ठेवायचा? हा प्रश्नच आहे, असे म्हणत काही रहिवाशांनी आता थेट न्यायालयातच याविरोधात धाव घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासंबंधी अंतिम निर्णय लवकरच होईल, अशी माहिती मरिन लाईन्स परिसरातील एका रहिवाशाने मुंबई लाइव्हला नाव न घेण्याच्या अटीवर दिली आहे.



हेही वाचा

मेट्रोसाठी २४ भूखंडांचे आरक्षण बदलणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा