मेट्रो 3 साठी काहीही...

 Mumbai
मेट्रो 3 साठी काहीही...

‌मुंबई - कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो 3 मार्गातील धोकादायक इमारतीतील कुटुंबांना काही दिवस हॉटेलमध्ये संसार मांडावा लागणार आहे. टनेलिंगचे काम करताना टनेल मशीन चालवताना धोकादायक त्यातही दक्षिण मुंबईतील धोकादायक इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा इमारतीतील कुटुंबांना नजीकच्या हॉटेलमध्ये तात्पुरते काम होईपर्यंत स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरसीचे कार्यकारी संचालक (नियोजन) आर रमण्णा यांनी 'मुंबई लाईव्ह'ला दिली आहे. तर हॉटेलमधील हे स्थलांतर दोन दिवस ते दोन आठ्वड्यासाठी असू शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‌जून- जुलैमध्ये टनेल मशीन आणि इतर यंत्र सामग्री मुंबईत दाखल होणार आहे त्यानुसार याच काळात बांधकाम पूर्व सर्व्हे करण्यात येणार आहे. या सर्व्हेमध्ये कुठल्या इमारतींना टनेलिंगचे काम करताना धोका पोहोचू शकतो याची तपासणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे धोकादायक इमारतीतील कुटुंबाला हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे. काही दिवसांसाठी अगदी दोन दिवस ते दोन आठ्वड्यासाठी या कुटुंबांची व्यवस्था करायची असल्याने हॉटेल हाच पर्याय योग्य होता, असे रमण्णा यांनी सांगितले.

‌गिरगावकर मात्र एमएमआरसीचा हा निर्णय ऐकून आवाक झाले आहेत. या निर्णयावर हसावे की रडावे हेच कळत नसल्याची प्रतिक्रिया आम्ही गिरगावकर ग्रुपचे गौरव सागवेकर यांनी दिली आहे. तर लवकरच याविषयी बैठक घेत पुढे याबाबत काय निर्णय घायचा हे ठरवू असे ही स्पष्ट केले आहे. असे असले तरी घराशेजारच्या हॉटेलमध्ये काही दिवस का होईना पण हॉटेलमध्ये राहण्याचा योग मेट्रोमुळे काही कुटुंबाला मिळणार हे मात्र नक्की.

Loading Comments