मेट्रो ३ कारशेडसाठी बीकेसीतील बुलेट ट्रेनच्या जागेची चाचपणी

कांजूरमार्ग येथील जागेवर मेट्रो ३ च्या कारशेडच्या बांधकामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे कारशेडसाठी सरकारने आता वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील बुलेट ट्रेनच्या जागेवर चाचपणी सुरू केली आहे. 

फडणवीस सरकारने मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे येथील जागा निश्चित केली होती. मात्र, या जागेवर जंगल घोषित करून ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरमध्ये हलवले. या ठिकाणी कारशेडच्या बांधकामालाही सुरुवात करण्यात आली. मात्र, कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर बुधवारी सुनावणी झाली.

सुनावणीत कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने एमएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे सरकारसमोरील पेच आणखी वाढला आहे. मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो ३ चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का या पर्यायाची चाचपणी आता सरकार करत आहे.

न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला वेळ लागू शकतो. तोपर्यंत कारशेड उभारण्यास विलंब लागू नये म्हणून ठाकरे सरकारकडून पर्यायी जागेची चाचपणी सुरु झाल्याचं समजतं.


हेही वाचा -

मिठी नदीच्या साफसफाईसाठी केंद्राकडून एकही दमडी मिळाली नाही, RTI मधून खुलासा

मुंबईच्या गल्लीबोळात राहणार आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर


पुढील बातमी
इतर बातम्या