अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर गणपती विसर्जनानंतर...

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

भेंडीबाजारमधील हुसैनीवाला इमारत कोसळून ३३ जणांचा बळी गेल्यानंतर जाग आलेल्या म्हाडाने येत्या २४ तासांत दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढायचे ठरवले. शनिवारपासून कारवाईला सुरूवात होणार होती, त्यासाठी म्हाडाचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तयारीही सुरू केली. पण पुरेसा पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने गणपती विसर्जनानंतरच या इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.

त्यानुसार येत्या २४ तासांत दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीसा शनिवारपासून बजावण्यात येतील. जे रहिवासी नोटीस बजावल्यानंतर पुढच्या २४ तासांत इमारत रिकामी करणार नाहीत, त्यांना जबरदस्तीने स्थलांतरीत करण्यात येईल. मात्र या रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढण्याच्या कारवाईला गणपती विसर्जनानंतर सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. तसे आदेशही म्हाडाला देण्यात आले आहेत.

रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढण्यासाठी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे. परंतु सध्या मोठ्या संख्येने पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात आहेत. तसेच या कारवाईमुळे गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये, म्हणून ही कारवाई गणेशोत्सवानंतरच हाती घ्यावी, असे आदेश वायकर यांनी म्हाडाला शुक्रवारी दुपारी झालेल्या बैठकीत दिल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

९ इमारतींचा यादीत समावेश

उपकरप्राप्त १४ हजार इमारतींपैकी ९ इमारतींचा यावेळच्या अतिधोकादायक यादीत समावेश आहे. मात्र या इमारतीतील अजूनही कित्येक रहिवाशांना अद्याप म्हाडाने स्थलांतरीत केलेले नाही. त्यामुळे हे रहिवासी मृत्यूच्या सावटाखाली जगत आहेत. दरम्यान ९ 'एक्स्प्लेन्ड मेन्शन'मधील रहिवासी न्यायालयात गेले असून न्यायालयाने रहिवाशांना स्वत:च्या जबाबदारीवर अतिधोकादायक इमारतीत रहायची परवानगी दिली आहे.

तर, 'काझी सय्यद स्ट्रीट' इमारतीमधील एक रहिवासी वगळता सर्व रहिवासी स्थलांतरीत झाले आहेत. या इमारतीचा प्रश्नही न्यायालयात आहे. सी वाॅर्डमधील १०१-१११ बारा इमाम रोड या इमारतीतील रहिवाशांनी वक्फ बोर्डाकडे धाव घेतली आहे.

याच इमारतीतीत मोठ्या संख्येने रहिवासी राहात असून या रहिवाशांना बाहेर काढण्याचे आव्हान म्हाडासमोर आहे. येथील रहिवाशांना विशेष बाब म्हणून जबरदस्तीने बाहेर काढून संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

जीवितहानी होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे ट्रिब्युनलला कळवण्यात येणार असल्याचेही भांगे यांनी सांगितले आहे. उर्वरित ६ इमारतीपैकी २ इमारती पूर्णपणे रिकाम्या केल्या असून उरल्या सुरल्या रहिवाशांनाही गणेशोत्सवानंतर बाहेर काढण्यात येणार आहे.

भेंडीबाजारमधील रहिवाशांना त्वरीत हलवा

भेंडीबाजार समुह पुनर्विकास प्रकल्पातील सर्व अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना त्वरीत स्थलांतरीत करून या इमारती पाडाव्यात, असे आदेश वायकर यांनी दिले आहेत. त्यानुसार म्हाडाने बैठकीनंतर त्वरीत हे आदेश बुऱ्हाणी ट्रस्टला कळवल्याचेही भांगे यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प १० ते १५ वर्षे सुरू राहणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील इमारतींची लवकरात लवकरच दुरूस्ती करण्याचे आदेशही वायकर यांनी दिले असून तशी दुरूस्ती बुऱ्हाणी ट्रस्टकडून करून घेण्यात येणार आहे.

प्री मान्सून सर्व्हे करा

समुह पुनर्विकास मार्गी लागेपर्यंत इमारतींच्या आणि रहिवाशांच्या सुरक्षितेची योग्य ती जबाबदारी आता बुऱ्हाणी ट्रस्टला घ्यावी लागणार आहे. या इमारती धोकादायक, अतिधोकादायक आहेत का? पावसाळ्यात त्यांना धक्का पोहचेल का? आणि कोणत्या इमारतींना दुरूस्तीची गरज आहे? अशा बाबींसंदर्भातील पावसाळ्यापूर्व सर्वेक्षण दरवर्षी बुऱ्हाणी ट्रस्टला करावे लागणार आहे. तसे आदेशच सरकारकडून देण्यात आले आहेत.

स्थलांतरासाठी चाचपणी सुरू

३ हजार धोकादायक इमारतीतील रहिवाशांनाही शक्य तितक्या लवकरच हलवण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार या रहिवाशांना कसे आणि कुठे हलवायचे, सर्वच इमारतीतील रहिवाशांना हलवावे लागेल का अथवा इमारतीची योग्य दुरूस्ती केले तरी चालले अशा सर्व बाबींची चाचपणीही सुरू झाल्याचेही भांगे यांनी स्पष्ट केले आहे.

२४ तासांत घरे खाली करण्याच्या नोटीसा रहिवाशांना पाठवण्यात आल्या आहेत. रहिवाशांना बाहेर काढण्याची कारवाई एक-दोन दिवसांत सुरू करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. मात्र गणेशोत्सव सुरू असल्याने पोलीस बंदोबस्त मिळण्याची शक्यता कमी आहे. तोपर्यंत आम्ही रहिवाशांना जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यासंबंधीची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहोत. विसर्जनानंतर पोलीस बंदोबस्त मिळाल्याबरोबर कारवाईला सुरूवात होईल.

- सुमंत भांगे, मुख्य अधिकारी, दुरूस्ती मंडळ, म्हाडा


हे देखील वाचा -

३ हजार धोकादायक इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढणार?

भेंडीबाजार इमारत दुर्घटनेला जबाबदार कोण? बुऱ्हाणी ट्रस्ट, म्हाडा, कि रहिवासी?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या