CSMT स्थानक जगात सर्वात आश्चर्यकारक!

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जगातील दुसऱ्या क्रमांकाचं आश्चर्यकारक रेल्वे स्थानक ठरलं आहे. ‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील १० आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. न्यू-यॉर्कच्या ग्रँड सेंट्रल टर्मिनलने या यादीमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय, तर लंडनचं सेंट पँक्रास इंटरनॅशनल स्थानक तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही माहिती मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे दिली आहे.

जागतिक वारशात समावेश

१८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त हे स्थानक बांधण्यात आलं होतं. तब्बल १३२ वर्षे जुनं असलेलं हे स्थानक फेड्रीक विल्यम स्टिव्हन्स यांनी बांधलं. मुघल आणि व्हिक्टोरियन गॉथिकच्या वास्तूकलेवर आधारित सीएसएमटी स्थानक वास्तूकलेचा अद्भूत नमूना समजला जातो. यूनेस्कोच्या जागतिक वारसा (world heritage) यादीत स्थान मिळालेलं हे एकमेव स्थानक आहे. 

सर्वाधिक वर्दळीचं

या स्थानकाचं नाव आधी व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) असं होतं. नंतर स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं. या इमारतीत मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. सीएसएमटी देशातील सर्वाधिक वर्दळीचं स्थानक आहे. दररोज ३ दशलक्ष प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.  

जगातील १० सर्वाधिक आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांची यादी :  

  • ग्रँड सेंट्रल टर्मिनल, न्यू-यॉर्क
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई
  • सेंट पँक्रास इंटरनॅशनल , लंडन
  • अटोचा स्टेशन, माद्रिद
  • अँटवर्प सेंट्रल, अँटवर्प
  • गारे डू नॉर्ड, पॅरिस
  • सिरकेसी स्टेशन, इस्तांबुल
  • सीएफएम रेल्वे स्टेशन, मापुटो (Maputo)
  • कानाझ्वा स्टेशन, कानाझ्वा (Kanazawa)
  • क्वालालंपूर रेल्वे स्टेशन, मलेशिया

हेही वाचा-

ONGC आगीमुळे सीएनजी, पीएनजी गॅस पुरवठ्यावर परिणाम

ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार एसी लोकल


पुढील बातमी
इतर बातम्या