मे २०२२ पर्यंत पूर्ण होईल समृद्धी महामार्ग

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचं बांधकाम वेगात सुरू आहे. हा महामार्ग १ मे २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी गुरूवार ८ आॅक्टोबर २०२० रोजी दिली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. (mumbai nagpur samruddhi mahamarg will complete in may 2022 says msrdc) 

एकूण ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावरील १५२.१७ किमी रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं आहे. १ मे २०२१ पर्यंत शिर्डीपर्यंतचा उर्वरीत ५२० किमीचा मार्ग आणि इगतपुरीपर्यंतचा ६२३ किमीचा मार्ग १ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर १ मे २०२२ पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला असेल. समृद्धी महामार्गाच्या बांधकामात १८ हजार  कामगार कार्यरत होते. परंतु कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊमध्ये अनेक कामगार गावी गेल्याने बांधकामाचा वेग थोडा मंदावला होता. परंतु मागील २ महिन्यांपासून कामगार कामावर परतत असल्याने सद्यस्थितीत २० हजारांहून अधिक कामगार या प्रकल्पात काम करत असल्याची माहिती राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

७०१ किमीचा समृद्धी महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई या दोन शहरांमधील अंतर ८ तासांत पूर्ण करता येणार आहे. एकूण ५५ हजार ३३२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. महामार्गावर ८ बोगदे, व्हायाडक्ट्स, रेल्वेमार्गावरील पूल, नदीवरील पूल इत्यादी बांधकामाचा समावेश असेल.

समृद्धी महामार्गालगत १९ नव्या शहरांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक शहरात स्वतंत्र कृषी समृद्धी केंद्र असेल. सद्यस्थितीत ८ शहरांचा विकास आराखडा तयार असून ८ पैकी ६ शहरांसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पुढील वर्षीच्या जूनपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास राधेश्याम मोपलवार यांनी व्यक्त केला.  


हेही वाचा -

समृद्धी महामार्गाने उद्योगांचं जाळं विणून राज्यात समृद्धी यावी- उद्धव ठाकरे

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय


पुढील बातमी
इतर बातम्या