महाड इमारत दुर्घटना: बिल्डरसह ५ जणांवर गुन्हा दाखल

रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील तारीक पॅलेस ही ५ मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी या इमारतीचं बांधकाम करणारा बिल्डर यासह तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तारीक पॅलेस ही इमारत सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या इमारतीचं बांधकाम करणारा बिल्डर फारूक काझी याच्यासह आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे , वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड, अभियंता शशिकांत दिघे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.  

हेही वाचा- भयंकर! महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली, १५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

साधारणपणे ५ वर्षांपूर्वी या इमारतीचं बांधकाम झाल्याचं म्हटलं जातं.  गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र, त्याने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे समजत आहे. या इमारतीमध्ये ४५ फ्लॅट होते. ज्यापैकी १८ फ्लॅट रिकामे होते. इमारतीच्या ए विंग मध्ये राहणारे ३० रहिवासी दुर्घटना घडायच्या आधीच इमारतीबाहेर पळाले. तर बि विंगमधील ६० पैकी ५१ रहिवासी देखील याचपद्धतीने बाहेर आले. सध्या ए विंगमधील ८ जण तर, बी विंगमधील ९ जण बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ढिगारा उपसण्याचं काम युध्द पातळीवर सुरु असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके या कामी गुंतलेली आहेत.  

इमारत कोसळल्यानंतर परिसरात प्रचंड धूर झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी कोसळलेल्या इमारतीचा प्रचंड ढिगारा दिसला तसंच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांचे आवाज आल्याने स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरु केलं. तोपर्यंत अग्निशमन दल आणि बचाव पथकाच्या चार टीमने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरूवात केली. जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मानगांव विभाग, श्रीवर्धन विभाग येथून अतिरिक्त कुमकही बोलावण्यात आली आहे.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंकडून रायगडला १०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर 
पुढील बातमी
इतर बातम्या