Advertisement

Cyclone Nisarga: उद्धव ठाकरेंकडून रायगडला १०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या रायगडला १०० कोटी रुपयांची तातडीची मदत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

Cyclone Nisarga: उद्धव ठाकरेंकडून रायगडला १०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर
SHARES

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या रायगडला १०० कोटी रुपयांची तातडीची मदत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. शिवाय रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे जलदगतीने पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. रायगडला मदत जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी पॅकेज हा शब्द बोलण्याचा टाळला. आम्ही थेट मदतीलाच सुरुवात केली आहे,' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार ५ जून २०२० रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ इथं निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री अस्लम शेख देखील उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान निसर्ग चक्रीवादळ संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले.

हेही वाचा - मुंबईवर मुंबादेवीची कृपा- उद्धव ठाकरे

आपण रायगड जिल्ह्यासाठी कुठलंही पॅकेज दिलेलं नसून तातडीने १०० कोटी रुपयांची मदत दिली आहे. सर्वप्रमथम निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आपल्याला अंदाज घ्यावा लागेल, उगाच वरेमाप घोषणा करण्यात काहीच अर्थ नाही. निसर्ग दिवसेंदिवस आपले रंग दाखवीत असताना यंत्रणेनेही आता कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी उत्तम नियोजन ही काळाची गरज आहे. रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी या संकटाचा निश्चितच उत्तम मुकाबला केला. त्यामुळे कमीतकमी जीवितहानी झाली.

पंचनामे पूर्ण होण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र नुकसान झालेल्या लोकांनी झालेल्या नुकसानीचे फोटो काढून ठेवावेत, व्हिडिओ काढून ठेवावेत. नुकसानीचे काढलेले फोटो व व्हिडीओ पंचनामाच्या कार्यवाहीत ग्राह्य धरण्यात येतील. चक्रीवादळाच्या संकटातून बाहेर पडलो तरीही कोरोनाचं संकट गेलेलं नाही. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे, त्याची साफसफाई करावी लागेल, झाडाचा पाला कुजेल, जनावरे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले असतील तर ते सडण्याची शक्यता आहे, त्यातून रोगराई होण्याची शक्यता आहे, ही साफसफाई लवकर झाली पाहिजे. जशी रायगडसाठी घोषणा केली आहे, तसंच इतर जिल्ह्यांचं नुकसान झालं आहे, त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या प्रमाणे काळजी घेणार आहोत. 

 सर्वात जास्त नुकसान विजेच्या खाबांचे  झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत होण्यासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळाची गरज लागणार आहे. यासाठी शासन स्तरावरून मदत निश्चित केली जाईल. विजेचा प्रवाह, मोबाईल कनेक्टिव्हिटी पूर्ववत झाली पाहिजे, काही जणांची घरे पडली आहेत त्यांना सुरक्षित स्थळी जरूर हलवलं आहे, पण त्यांच्या घरांची नासधूस झाली आहे, या काही प्राधान्यक्रमाने करण्याच्या गोष्टींबद्दल प्रशासन सतर्क आहे. त्याला प्राधान्य देऊन आपण कामं करतो आहोत.

हेही वाचा- कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, फडणवीसांचा गंभीर आरोप

याबरोबरच ज्या नागरिकांचा  या वादळामुळे अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, शासन त्यांच्या अन्नधान्याचा,  जेवणाचा प्रश्न निश्चितच सोडविणार. जनतेच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभं आहे. पूर्ण सतर्कतेने प्रशासन दक्ष आहे, काळजी घेत आहे. मला खात्री आहे की लवकरात लवकर माझा रायगड आणि माझे सगळे जिल्हे हे पूर्ववत करू आणि जनजीवन सामान्य करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

यावेळी अलिबाग तालुक्यातील उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे, वय वर्ष ५८ ही व्यक्ती चक्रीवादळामुळे विजेचा खांब अंगावर पडून मृत्युमुखी पडली होती. त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून ४ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा