कुत्रा पाळायचाय? मग त्याआधी हे वाचा

घराचा रखवालदार म्हणून घरात बाळगला जाणारा कुत्रा हौस म्हणून घराघरात पोहोचला. कालांतरानं ही हौस फॅशन झाली. त्यानंतर फॅशनचं रूपांतर स्टेट्स सिम्बॉलमध्ये झालं. हळूहळू त्यानं कुटुंबाच्या फोटोमध्ये जागा देखील पटकावली. आता तर तो कुटुंबाचा अविभाज्य भाग झाला आहे.

अनेक घरांमध्ये हल्ली कुत्रे पाळले जातात. त्यामागे प्रत्येकाची वेगळी कारणं आहेत. तुम्ही देखील कुत्रा पाळण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला या गोष्टी माहिती असतील तर कुत्रा पाळावा की नाही या द्विधा मनस्थितीतून तुम्ही नक्की बाहेर पडाल.

१) आपल्या सहवासात राहणारे कुत्रे हे आपलं व्यक्तीमत्व जाणून घेत असतात. आपल्या प्रतिक्रियांचा ते आपल्या परीनं अर्थ लावत असतात. प्रत्येक व्यक्तीला मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न ते करत असतात.

२) कुत्र्यांना दिलेलं प्रॉमिस पाळणं आवश्यक आहे. तुम्ही कुठलं प्रॉमिस त्यांना केलं असेल आणि ते पाळलं नाहीत तर ते नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवतात.

३) एखादी व्यक्ती कुत्र्याच्या नजरेतून उतरली की मग ते पुन्हा विश्वास ठेवत नाहीत. त्यांचा विश्वास पुन्हा संपादन करणं कठीण आहे.

४) कुत्र्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. तुम्ही किंवा इतर त्याच्याशी कसं वागता हे त्यांच्या चांगलं लक्षात राहतं.

५) कुत्रे त्यांच्या मालकाचं आणि कुटुंबाचं संरक्षण करतात. कोणत्याही प्रकारची इजा झालेली त्यांना सहन होत नाही.

६) एखाद्या अनोळखी व्यक्तीशी कुत्र्याच्या मालकाशी झालेलं भांडण कुत्रा कधीच विसरत नाही. एकवेळ मालक विसरेल. पण कुत्रा ते कायमस्वरूपी लक्षात ठेवतो. मग तुम्ही त्या कुत्र्यांचे कितीही लाड करा किंवा त्याला खायला द्या. पण तो तुमच्याशी कधीच मैत्री करणार नाही.

७) जेव्हा कुत्रे खूप आनंदी असतात तेव्हा ते आपली शेपूट जोरात हलवतात. पण कुत्रे रागात असतील तर त्यांची शेपूट ताट होते. घाबरलेले असतील तर ते शेपूट आतल्या बाजूला फोल्ड करतात

८) सिगारेटच्या धुरानं कुत्र्यांना ट्युमर किंवा फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

९) कुत्र्यांमध्ये माणसांपेक्षा चार पटीनं अधिक ऐकण्याची क्षमता असते.

१०) आपल्या आसपास काय चाललंय किंवा काय आहे हे कुत्र्यांना अंधारातही कळतं.

११) एक वर्षाचा कुत्रा हा १५ वर्षाच्या माणसापेक्षा अधिक प्रौढ असतो.


हेही वाचा

पेट्सचा वाढदिवस साजरा करायचाय? मग आहे ना 'पपकेक फॅक्टरी'


 

पुढील बातमी
इतर बातम्या