EXCLUSIVE : १२०० फोन्सचा मालक, 'नोकिया मॅन' आहे याची ओळख!

सुपर मॅन, आर्यन मॅन, बॅटमॅन या महापुरषांना तुम्ही चित्रपटांमधून पाहिलंच असेल. पण तुम्ही 'नोकिया मॅन' बद्दल कधी ऐकलं आहे का? नाही नाही हे कुठल्या हॉलिवूड किंवा बॉलिवूड चित्रपटातील कॅरेक्टर नाही. तर प्रत्यक्षात अशी व्यक्ती आहे जी 'नोकिया मॅन' या नावानं ओळखली जाते. हे सर्व ठिक आहे. पण याला 'नोकिया मॅन' का म्हणतात बरं? तो सुपर मॅनसारखा कुठला स्टंट करतो की काय? अशा प्रश्नांचा कल्लोळ तुमच्या मनात सुरू असेल. तर याचं साधं उत्तर असं आहे की तो फक्त त्याचा हटके छंद जोपासतोय.

छंद असावा तर 'असा'

आपल्यापैकी अनेकांना कुठला ना कुठला छंद असतो. कुणाला बसचं तिकिट जमा करण्याचा, कुणाला १० चे कॉईन तर कुणाला फोटोग्राफीचा छंद असतो. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार छंद जोपासतो. तसाच छंद या 'नोकिया मॅन'नं जपला अाहे. या 'नोकिया मॅन'चं नाव आहे जयेश काळे. ठाण्यात राहणाऱ्या जयेश काळेनं हा भन्नाट छंद जोपासला आहे. त्याच्याकडे १२०० पेक्षा जास्त नोकिया फोन्स आहेत आणि तेही नोकियाची वेगळी मॉडल्स. नोकिया ९००० I, नोकिया 7110, 9110 हे नोकियाचे दुर्मिळ मोबाईल जयेशकडे आहेत. हो अगदी बरोबर वाचताय. नोकिया फोनसोबतच जयेशकडे बॅटरी, चार्जर, हेडफोनचासुद्धा संग्रह आहे. याशिवाय त्याच्याकडे हॉट व्हिल्स कार आणि जुन्या नोटांचा देखील संग्रह आहे.

कॉलेजला असताना माझा नोकियाचा मोबाईल एकदा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. पडल्यानंतर फोनची बॅटरी बाहेर निघाली होती. ती मी व्यवस्थित लावली आणि आश्चर्य म्हणजे मोबाईल पूर्वीसारखा सुरू झाला. पण काही काळानंतर मी नोकियाचा नवीन मोबाईल घेतला. पण जुना मोबाईल सांभाळून ठेवला. जसजसं मी नोकियाचे नवीन मोबाईल घ्यायचो. तसतसा माझ्याकडे जुन्या मोबाईलचा संग्रह होत गेला. सुरुवातीला २० मोबाईलचं कलेक्शन सद्यस्थितीत १२०० च्या वर गेलं आहे.

- जयेश काळे

मोबाईल सांभाळणं मोठं काम

जयेशच्या नोकिया कलेक्शनमध्ये अनेक दुर्मिळ फोन आहेत. त्याचं घर मोबाईलनं भरून गेलं आहे. घरातल्या कोणत्या कोपऱ्यात मोबाईल नाही हे विचारा. घरात जागा कमी पडते त्यामुळे जवळपास ४०० मोबाईल्स कारच्या डिक्कित ठेवलेत. त्यामुळे कुठे बाहेर गेलं की, सुरक्षेच्या कारणास्तव त्याची अनेकदा चौकशी केली गेलीय. अनेकदा कस्टम डिपार्टमेंटनं देखील त्याची चौकशी केली आहे. कारण तो अनेकदा परदेशातून मोबाईल मागवतो. जयेशची बहिण लंडनला राहते. त्यामुळे त्यानं ३००-४०० मोबाईल तिकडून मागवले आहेत. यासोबतच त्याचे काही मोबाईल डिलर्ससोबत देखील ओळख आहे. त्यांच्या मदतीनं त्यानं काही मोबाईल्स जमवले आहेत. आत्तापर्यंत जमवलेल्या मोबाईलसाठी जयेशनं १൦ ते १२ लाख गुंतवले आहेत.  

सुट्टीच्या दिवशी देखील जयेशचा पूर्ण वेळ या मोबाईलमध्येच जातो. प्रत्येक मोबाईलची बॅटरी चार्ज करणं, मोबाईलचा काही प्रॉब्लेम तर नाही ना? हे तपासून बघावं लागतं. जर हे केलं नाही तर मोबाईल बंद पडू शकतो. त्यामुळे विकेंडला माझा प्लॅन ठरलेला असतो. त्यामुळे घरचे देखील काहिसे नाराज असतात. पण जयेशचं सर्व स्थरावरून होणारं कौतुक पाहून त्यांना त्याचा अभिमान देखील वाटतो.  

नोकिया मॅनची 'लिम्का' वारी

जयेशच्या या छंदाची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'नं देखील घेतली आहे. आता त्याचं लक्ष्य गिनिज रेकॉर्डवर आहे. वर्ल्ड रकॉर्डसाठी युनिक फोन्स असावे लागतात. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सध्या सर्वात जास्त फोन असल्याचा जागतिक विक्रम १६०० आहे. जयेशला आपला संग्रह वाढवायचा असून हा आकडा पार करायचा आहे. तरच त्याचं नाव गिनिज रेकॉर्डमध्ये नोंद होईल. 

जयेश काळे हा डिजिटल एजन्सीमध्ये क्रिएटीव्ह हेड म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे कामासोबतच त्यानं त्याचा छंद जोपासला आहे. त्यामुळे इच्छा असेल तर सर्व शक्य आहे, याचं उत्तम उदाहरण जयेशनं दिलं आहे.

 


हेही वाचा

लडाख ऑन टू व्हील; १९ वर्षीय कनकाचा थक्क करणारा प्रवास

कॅफे चालवणारे 'स्पेशल १३'

पुढील बातमी
इतर बातम्या