घरच्या घरी बनवा माऊथ वॉश

रोज सकाळी उठल्यावर दात आपण घासतोच. दिवसभर वारंवार आपण काहीना काही खात असतो. त्यानंतर चूळ भरली तरी पूर्णपणे दात स्वच्छ होत नाहीत. परिणामी तोंडातून दुर्गंधी येते. आता प्रत्येक वेळी ब्रश करणं शक्य नसतं. मग अशा वेळी दातांची स्वच्छता राखण्यासाठी अनेक जण माऊथ वॉशचाही वापर करतात. पण बाजारात उपलब्ध असणारी माऊथ वॉश वापरण्यापेक्षा तुम्ही घरगुती माऊथ वॉश वापरणं अधिक फायद्याचं आहे. घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा माऊथ वॉशमध्ये समावेश असल्यानं त्याचे काही साईड इफेक्ट नाहीत. त्यामुळे घरच्या घरी माऊथ वॉश बनवण्याच्या काही सोप्या टिप्स...

१) लवंग आणि दालचिनी माऊथ वॉश

एका भांड्यात पाणी घ्या. त्यात दालचिनीच्या तेलाचे १० आणि लवंगच्या तेलाचे १० थेंब मिक्स करा. हे माऊथ वॉश अनेक दिवस स्टोर करून ठेवलं तरी खराब होत नाही. यामुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधी जाईल आणि दातांना कीडदेखील लागणार नाही.

२) डाळिंब माऊथ वॉश

डाळिंबाची सालं काही दिवस उन्हात सुकवा. सालं सुकली की त्याची पावडर करून घ्या. ही पावडर पाण्यामध्ये मिक्स करा. त्यानंतर काही वेळ उकळा. मिश्रण थंड झाल्यानंतर बाटलीत भरून ठेवा. याचा वापर माऊथवॉश म्हणून करू शकता.

३) मीठ आणि तुरटी

पाणी गरम करा. त्यानंतर साधारण पाणी कोमट झाले की त्यात किंचित मीठ आणि तुरटी घालून त्यानं गुळण्या करा.

४) पेपरमिंट माऊथ वॉश

यासाठी एक कप पाण्यात थोडा बेकिंग सोडा टाका. त्यात ८ ते ९ पुदीन्याची पानं आणि ट्री ऑईलचे दोन थेंब टाकून मिश्रण तयार करा. चाळणीनं गाळून घ्या. तुमचं माऊथवॉश तयार आहे.

५) ओवा आणि पुदीना माऊथ वॉश

एक कप पाण्यात दोन चमचे ओवा आणि दोन चमचे पुदिना रस मिक्स करा. त्यानंतर एका बाटलीत हे मिश्रण काढून ठेवा. यामुळे तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीची समस्या दूर होईल.


हेही वाचा -

'इथं' प्राण्यांच्या विष्ठेपासून बनते कॉफी

डेंग्यू, मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून 'असं' करा संरक्षण


पुढील बातमी
इतर बातम्या