नवनवीन जोड्या जमणं आणि त्या पुन: पुन्हा पडद्यावर एकत्र येणं ही चित्रपटसृष्टीसाठी नित्याचीच बाब बनली आहे. पण यातील काही अनपेक्षित जोड्या सर्वांसाठीच आकर्षणाचं केंद्र बनतात. शशांक केतकर आणि नेहा जोशी ही अशीच एक नवी कोरी जोडी रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
हौसेखातर अभिनय करत असताना त्याचं व्यवसायात रूपांतर कधी झालं हे त्याला कळलंच नाही. ऑस्ट्रेलियात अभियंत्याचं उच्च शिक्षण घेत असताना तो हौसेखातर सांस्कृतिक कार्यक्रमांतून अभिनय करायचा. पुढे भारतात परतल्यावर पुण्यात त्याने अभिनयक्षेत्रातच काम करायचं ठरवलं.
नाटक, मालिका केल्या; परंतु 'होणार सून मी त्या घरची' या मालिकेनं त्याचं आयुष्यच पालटून टाकलं. 'होणार सून मी या घरची' मालिकेत श्री ही व्यक्तिरेखा साकारणारा शशांक केतकर अल्पावधीत महाराष्ट्रातील रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. 'वन वे तिकीट' व '३१ दिवस'सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून दिसलेला शशांक आता आगामी मराठी चित्रपट 'आरॉन'मध्ये एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.
पुण्यात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजविणारी नेहा जोशी हिला 'क्षण एक पुरे' या व्यावसायिक नाटकानं मनोरंजनसृष्टीत आणलं. २००० मध्ये 'ऊन पाऊस' ही मालिका मिळाली व नेहा घराघरात पोहोचली. मालिका, नाटकं, चित्रपट यातून चतुरस्त्र भूमिका साकारत तिने आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. 'झेंडा', 'सुंदर माझे घर', 'पोश्टर बॉईज', 'पोश्टर गर्ल', 'लालबागची राणी' हे तिचे काही चित्रपट. अलीकडेच ती 'वाडा चिरेबंदी' या नाट्यत्रयीत व 'फर्जंद' या चित्रपटातही दिसली. आता ती 'आरॉन' या आगामी मराठी चित्रपटात काहीशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
'आरॉन' या आगामी मराठी चित्रपटात शशांक व नेहाची जोडी जमली आहे. शशांक व नेहा हे दोन पुणेकर आता पॅरिसमध्ये चित्रित झालेल्या 'आरॉन' चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. दोघांनीही अप्रतिम भूमिका निभावल्या असून एक आगळी वेगळी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जिएनपी फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून, ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
हेही वाचा-
अक्षय-निखीलच्या भटकंतीचं 'गॅटमॅट'
तनुश्रीचे सर्व आरोप खोटे; नानाच्या वकिलांचं महिला आयोगाकडे लेखी उत्तर