आजवर बऱ्याच कलाकारांनी ऐतिहासिक भूमिकांमध्ये रंग भरत आपलं अभिनयकौशल्य सिद्ध केलं आहे. अशांपैकीच एक असलेला अभिनेता अजय पूरकर आता सुभेदार तानाजी मालुसरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे.
असीम निष्ठा आणि अतुलनीय शौर्यानं मराठेशाहीच्या इतिहासात आपला अमीट ठसा उमटविणारं व्यक्तिमत्व म्हणजे... सुभेदार तानाजी मालुसरे. वयाच्या १६ व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या निष्ठावान सहकाऱ्यांच्या मदतीनं स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत ‘स्वराज्यासाठी लढण्याची आणि मरण्याची’ शपथ घेतली, याच मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. या सुभेदार तानाजी मालुसरे यांची तडफदार व्यक्तिरेखा अभिनेता अजय पूरकर ‘फत्तेशिकस्त’ या आगामी चित्रपटात रंगवली आहे. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आपल्या वाट्याला येणाऱ्या व्यक्तिरेखांमधलं वेगळेपण जपत रंगभूमी, चित्रपट, मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अजयसाठी ही खऱ्या अर्थानं भूमिका आव्हानात्मक होती. ‘फर्जद’ चित्रपटामधील ‘मोत्याजी मामा’ यांची भूमिका साकारल्यानंतर अत्यंत शूर आणि पराक्रमी अशा तानाजींच्या या भूमिकेसाठी वेगळेपण जपणं गरजेचं होतं. ‘फर्जंद’मध्ये अजयनं साकारलेल्या मोत्याजी मामानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळंच कदाचित ‘फत्तेशिकस्त’मध्ये त्याच्या वाट्याला पुन्हा एकदा एक आव्हानात्मक व्यक्तिरेखा आली.
या भूमिकेबाबत बोलताना अजय म्हणाला की, ‘फर्जंद’च्या यशानंतर प्रेक्षकांना आमच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. मी साकारत असलेली तानाजींची व्यक्तिरेखा महत्त्वपूर्ण असल्यानं या व्यक्तिरेखेसाठी मी चांगलीच मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे यातील वेगळेपण जपण्यासाठी सिंहगडावरील तानाजीच्या पुतळ्यावरून प्रेरित होऊन माझी वेशभूषा करण्यात आली आहे. भूमिका अधिक चांगली वठण्यासाठी तलवारबाजी, घोडेस्वारी यासारखी अभ्यासपूर्ण तयारी केली आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शब्दांतून, अभिनायातून तसेच देहबोलीतून व्यक्त होणं गरजेच होतं त्यामुळं बारीक कंगोऱ्यांसह ही भूमिका उभी करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा -
मृणाल कुलकर्णींची अनोखी हॅटट्रीक
वडील-मुलगी बनलेले हे कलाकार दिसणार प्रियकर-प्रेयसीच्या रूपात!