Advertisement

मृणाल कुलकर्णींची अनोखी हॅटट्रीक

चतुरस्र मराठमोळी अभिनेत्री असा नावलौकिक मिळवलेल्या मृणाल कुलकर्णी यांनी हेच सूत्र आत्मसात करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

मृणाल कुलकर्णींची अनोखी हॅटट्रीक
SHARES

काही कलाकारांना नियती पुन: पुन्हा इतिहास घडवण्याची संधी देते. हुषार कलाकार आलेली संधी हेरतात आणि तिचं सोनं करतात. चतुरस्र मराठमोळी अभिनेत्री असा नावलौकिक मिळवलेल्या मृणाल कुलकर्णी यांनी हेच सूत्र आत्मसात करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

हॅटट्रीक म्हटलं की, आपल्याला लगेच क्रिकेटचा डाव आठवतो. पण केवळ क्रिकेटच्या खेळातच हॅटट्रीक होते असं नाही. इतर क्षेत्रांमध्येही पुन: पुन्हा त्याच घटना घडल्या की त्याला हॅटट्रीक म्हणण्याचा ट्रेंड आहे. याच ट्रेंडनुसार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही हॅटट्रीक केल्याचं निदर्शनास आलं आहे. अभिनयासोबतच लेखन-दिग्दर्शनाची कलाही अवगत असणाऱ्या मृणाल यांनी आपल्या कलागुणांनी कायम रसिकांसोबतच समीक्षकांनाही प्रभावित केलं आहे. एककल्ली भूमिका न साकारता त्यांनी नेहमीच वेगळेपणाचा ध्यास घेतला आहे. त्यामुळंच सकारात्मक भूमिकांसोबतच त्यांनी साकारलेल्या ग्रे शेडेड भूमिकांनीही रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘ये रे ये रे पैसा २’ या सिनेमात पुन्हा एकदा त्यांनी ग्रे शेडेड भूमिका साकारली होती. या सिनेमातील ग्रे शेडेड भूमिकेनंतर मृणाल यांनी पुनश्च राजमाता जिजाऊंचं रूप धारण केलं आहे. मृणाल यांनी यापूर्वीही काही ऐतिहासिक व्यक्तिरेखा सजीव केल्या आहेत. छोट्या पडद्यापासून सुरू झालेला हा प्रवास मोठ्या पडद्यापर्यंत कधी पोहोचला हे त्यांनाही समजलं नाही आणि रसिकांनाही… वयाच्या सोळाव्या वर्षी ‘स्वामी’ या मालिकेत मृणाल यांनी रमाबाई पेशव्यांच्या भूमिकेत टेलिव्हीजनवर केलेलं पदार्पण आजही त्यांच्या चाहत्यांच्या चांगलंच स्मरणात आहे. २०१२ मध्ये डाॅ. अमोल कोल्हेंच्या अभिनयानं सजलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत मृणाल यांनी राजमाता जिजाऊंची व्यक्तिरेखा साकारली.

२०१४ मध्ये मृणाल यांनी स्वत: लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘रमा माधव’मध्ये गोपिकाबाईंची भूमिका साकारली होती. गतवर्षी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या ‘फर्जंद’मध्ये मृणाल यांनी पुन्हा राजमातेचं रूप धारण केलं. आता दिग्पालच्याच दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘फत्तेशिकस्त’ या आगामी मराठी सिनेमात मृणाल पुन्हा राजमाता जिजाबाईंच्या रूपात अवतरणार आहेत. हा केवळ योगायोग नाही. कारण मागच्या वर्षी जेव्हा ‘फर्जंद’ रिलीज झाला होता, तेव्हाच दिग्पालनं स्पष्ट केलं होतं की, आपल्या आगामी ऐतिहासिक सिनेमात काही कलाकार तसेच राहतील. त्यावेळी मृणाल पुन्हा जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत मिळाले होते. आता दिग्पालचे शब्द सत्यात अवतरले आहेत.



हेही वाचा -

अशोकमामांचा तातोबा साकारणार हा कलाकार

अक्षयला आताच का सुचला मेट्रोचा प्रवास?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा