Advertisement

अक्षयला आताच का सुचला मेट्रोचा प्रवास?

ट्राफिकपासून वाचण्यासाठी चक्क अक्षयनं मेट्रोनं प्रवास केला. अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला. पण त्याचा हा कारनामा पाहून अनेकांनी मेट्रोचं प्रमोशन करतोय का? असा प्रश्न उपस्थित केला.

अक्षयला आताच का सुचला मेट्रोचा प्रवास?
SHARES

बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार चित्रपटांसोबतच त्याच्या अॅक्शन स्टंटसाठीदेखील ओळखला जातो. तो कधी काय करेल याचा काही नेम नाही. आता हेच बघा ना? ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी चक्क अक्षयनं मेट्रोनं प्रवास केला. अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला. पण त्याचा हा कारनामा पाहून अनेकांनी मेट्रोचं प्रमोशन करतोय का? असा प्रश्न उपस्थित केला.  

अक्षय कुमारला घाटकोपरवरून वर्सोव्याला जायचं होतं. पण गुगल मॅपवर ट्रॅफिकची स्थिती पाहून अक्षयनं मेट्रोनं जाण्याचा निर्णय घेतला. ट्रॅफिकमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा कमी वेळात मेट्रोने इच्छित स्थळी पोहोचण्याचा निर्णय अक्षयनं घेतला. अक्षय कुमारनं मेट्रो प्रवासाचा हा व्हिडीओ ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे.


काय बोलला अक्षय कुमार?

व्हिडीओसोबतच अक्षयनं कॅप्शन देखील दिली आहे. 'आज मी मुंबई मेट्रोनं प्रवास करत आहे. घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान असलेल्या ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी आणि बॉसप्रमाणे प्रवास करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे, असं कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडीओत तो म्हणाला आहे की, मी आता मेट्रोमध्ये आहे. माझ्या चित्रपटाचे चित्रीकरण घाटकोपरमध्ये सुरू आहे. आणि तिथून मला काही कामानिमित्त वर्सोवाला पोहोचायचे होते. घाटकोपरहून वर्सोवा पोहचण्यासाठी २ तासांचा कालावधी लागणार असल्याचं गुगल मॅपवर येत होतं. गुड न्यूज चित्रपटाच्या दिग्दर्शकानं मला मेट्रोनं प्रवास करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी एक- दोन बॉडीगार्ड घेऊन मेट्रोनं प्रवास केला. मेट्रोमुळे तुम्ही कमी वेळात इच्छीत स्थळी जाऊ शकता. मी २ तासांऐवजी २० मिनिटांमध्ये वर्सोव्याला पोहोचलो. मला वाटतं मेट्रोवर पावसाचा आणि ट्रॅफिकचा परिणाम होत नाही,' असं अक्षय कुमारनं म्हटलं.


नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित

अमिताभ बच्चन यांच्यानंतर अक्षय कुमार सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. अक्षयनं केलेल्या मेट्रो प्रवासावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आरे वाचवा या मोहिमेदरम्यानच कसं काय अक्षयला मेट्रोनं प्रवास करायचं सुचलं? बॉलीवूड विकला गेला आहे का? हा मेट्रो प्रवास स्पॉन्सर्ड आहे का? असे प्रश्न अक्षयला विचारण्यात आले आहेत. याशिवाय अनेकांनी हे देखील म्हटलं आहे की, आमचा मेट्रोला विरोध नाही. पण आरे कारशेडसाठी २ हजार ७०० झाडांचा बळी देण्यात येणार आहे आणि याला आमचा विरोध आहे.  






Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा