चहा विकणारा बनला दिग्दर्शक

एखाद्या अतिसामान्य कुटुंबातील व्यक्ती जेव्हा आपलं स्वप्न साकार करण्यात यशस्वी होते, तेव्हा सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळतात. ‘फांदी’ या सिनेमाचा दिग्दर्शक असलेल्या अजित साबळे या तरुणानेही परिस्थितीवर मात करत इथवर मजल मारली आहे.

इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर काहीही अशक्य नाही. हे आपल्या देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनी सिद्ध केलं आहे. मोदींसारख्या असंख्य लोकांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपलं करियर घडवलं आहे. योगायाग म्हणजे ‘फांदी’ या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या अजित साबळे या तरुणानेही बालवयात चहाच्या टपरीवर काम केलं आहे. २० जुलै रोजी अजितचा ‘फांदी’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘मुंबई लाइव्ह’शी विशेष संवाद साधताना अजितने आपल्या इथवरच्या रोमांचक प्रवासाबाबत सांगितलं.

खानापूर ते मुंबई

कोल्हापूर जिल्ह्यातील आजारा तालुक्यात असलेलं खानापूर हे अजित साबळेचं मूळ गाव आहे. खानापूरमध्ये सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अजितने मुंबईची वाट धरली. लोअर परेल येथील ना. म. जोशी मार्ग शाळेत त्याने पुढील शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मोठ्या जिद्दीनं तो सर्व्हर इंजीनियर बनला.

चहाची टपरी आणि रात्रशाळा

२००० मध्ये मुंबईत आल्यावर अजितला मुख्य आधार दिला तो विजय राणे यांनी. लोअर परेल स्टेशन समोरील त्रिशूळ बिल्डींगमध्ये राणेंच्या चहाच्या दुकानावर अजितने पाच वर्षे चहा देण्याचं काम केलं. या दरम्यान त्याने रात्रशाळेत जाऊन पुढचं शिक्षणही सुरू ठेवलं.

चायवाला ते आॅफिस बॅाय

चहाच्या टपरीवर काम केल्यानंतर अजितने मिळेल ते काम हाती घेत पुढचा प्रवास सुरू ठेवला. या प्रवासात अनेक परोपकारी हातही त्याच्यासाठी धावून आले. यापैकी एचडीएफसी बँकेच्या मॅनेजर शिल्पा राणे. या बँकेत आॅफिस बॅाय म्हणून काम करताना त्यांनी अजितला खूप सांभाळून घेतल्याने तो पुढील शिक्षण पूर्ण करू शकला.

आॅफिस बॅाय ते एलआयसी

कपडे विकणं, आॅनलाईन कापडी पिशव्या विकणं असे बरेच उद्योग करत अजित सर्व्हर इंजीनियर बनला. एलआयसीच्या योगक्षेम बिल्डिंगमध्ये नोकरी लागली. पण अजितचं मन त्याला गप्प बसू देत नव्हतं. लेखन-दिग्दर्शनात त्याला काहीतरी करायचं होतं. त्यामुळे नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर पुढील सहा महिन्यांमध्ये श्याम राणे आणि नामदेव जाधव यांनी विश्वास दाखवत अजितचा सर्व खर्च उचलला.

...आणि करेक्ट ट्रॅक सापडला

बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करत असताना अखेर मायबोली वाहिनीमध्ये अजितला नोकरी लागली. इथेच अजितला हवा असलेला करेक्ट ट्रॅक सापडला. त्यानंतर त्याने बऱ्याच वाहिन्यांसाठी काम केलं. दरम्यानच्या काळात अजितने ३००० पेक्षा जास्त सिनेमे पाहात आपला सिनेमावरचा अभ्यास सुरूच ठेवला होता.

रीतसर प्रशिक्षण

चौथीत असताना सोंगी भजनात काम केल्याने लेखन-दिग्दर्शनाची आवड असलेल्या अजितने लवीश जाधव, वामन केंद्रे, अशोक केंद्रे, नामदेव मुरकुटे यांच्या सान्निध्यात राहून फिल्म मेकिंगचे धडे गिरवले आहेत. हेच शिक्षण पुढे त्याच्या कामी आलं.

मराठीसोबत गुजरातीही

जवळजवळ ११ एकांकिकांचं लेखन-दिग्दर्शन करणाऱ्या अजितला ‘लगोरी’ या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच मालिकेसाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी लाभली. त्यानंतर ‘सुखं येतील, सुखं जातील’, ‘आनंदी आनंद गडे’, ‘अबोल जाई’ अशा काही मालिकांसाठीही अजितने काम केलं. याशिवाय त्याने ‘प्रीत, यू अॅन्ड पन्नाबेन’ आणि ‘कुमकुमना पगला पाड्या’ या गुजराती मालिकांसोबत ‘मळवट एक चक्र’, ‘बाई की बाटली?’ या नाटकांसाठी सहाय्यक दिग्दर्शन केलं.

आता फांदी...

‘फांदी’ या दिग्दर्शकाच्या रूपातील पहिल्या सिनेमाबाबत अजित म्हणाला की, हा सिनेमा सध्याची परिस्थिती मांडणारा आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर खूप चर्चेत राहिलं. ही ‘फांदी’ नेमकी कशाची आहे आणि ती काय करते ते सिनेमा पाहिल्यावरच समजेल.

सत्य घटनेला कल्पकतेची जोड

या सिनेमाची कथा वास्तवात घडली आहे. २००८ मध्ये माझ्या मित्राच्या मुलाच्या बाबतीत जी घटना घडली ती या सिनेमात दाखवण्यात आली आहे. आता तो मुलगा परदेशात आहे. सत्य घटनेला कल्पकतेची जोड देत अंधश्रद्धेवर प्रहार, समाजव्यवस्थेवर टीका करत फायद्याचं राजकारण करणाऱ्यांना विनोदी अंगाने चिमटे काढण्यात आले आहेत.

अशी जमली टीम

सायली शशिकांत पाटणकर ‘फांदी’च्या प्रस्तुतकर्त्या असून, राजेश खारकर, सायली पाटणकर, महेंद्र सोमासे निर्माते आहेत. अरुण नलावडे, भूषण घाडी, नितीन आनंद बोढारे, संदीप जुवाटकर, विशाल सावंत, अमोल देसाई, बाबा करडे, सतीश हांडे, फिरोज फकीर, भाग्यश्री शिंदे, स्नेहा सोनावणे, सुगंधा सावंत, चंदा जांभळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

सिनेमाकडून अपेक्षा

‘फांदी’ हा सिनेमा पाहून लोकांनी एखाद्या घटनेची वेळीच दखल घेतली आणि त्यावर इलाज करण्याचा प्रयत्न केला तर पुढे येणाऱ्या डोंगराएवढ्या संकटांना सामोरं जाण्याची वेळ येणार नाही. याची खूणगाठ जरी सिनेमा पाहिलेल्या प्रत्येकाने बांधली तरी खूप झालं.


हेही वाचा -

कोण बनणार ‘बिग बॉस’च्या घराचा नवा कॅप्टन?

‘बे एके बे’ साठी संजय बनला शिक्षक


 

पुढील बातमी
इतर बातम्या