शिवाजी पार्कवर स्वप्नीलच्या बॅटचा जलवा

क्रिकेट आणि सिनेसृष्टी यांचं खूप जवळचं नातं आहे. बऱ्याच कलाकारांनीही क्रिकेटर्सशी विवाह केला असून कलावंतही बऱ्याचदा क्रिकेट खेळताना दिसतात. हेच नातं शिवाजी पार्कच्या मैदानावर एका वेगळ्या रूपात पाहायला मिळालं. तरुणाईसह अबालवृद्धांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी मैदानावर उतरत क्रिकेट खेळला.

मी पण सचिन

ज्या शिवाजी पार्कच्या मैदानावर सगळ्यांचा लाडका 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर घडला, त्याच मैदानावर रुपेरी पडद्यावरील सचिन म्हणजेच स्वप्नील जोशी क्रिकेट खेळला. सध्या 'मी पण सचिन' या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या स्वप्नीलने आयती आलेली संधी साधत शिवाजी पार्कवर आपल्या बॅटचा जलवा दाखवला.

क्रिकेटची इच्छा पूर्ण

या चित्रपटाच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानावर क्रिकेट खेळण्याची 'मी पण सचिन' चित्रपटाच्या टीमची इच्छा पूर्ण झाली. लवकरच 'मी पण सचिन' हा क्रिकेटवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ध्येयाने झपाटलेल्या एका महत्वाकांक्षी तरुणाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 'क्रिकेटची पंढरी' अशी ओळख असणाऱ्या लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट खेळण्याचं स्वप्न सिनेमातील नायक म्हणजेच स्वप्नील जोशीचं असतं. त्याचे स्वप्न पूर्ण होतं, की नाही हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांसोबत खेळला सामना 

'मी पण सचिन' या सिनेमाच्या टिमने प्रकाश जाधव क्रिकेट अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांसोबत सामना खेळला. प्रकाश जाधव क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंवर मात करत, त्यांनी अटीतटीचा सामना जिंकला. या वेळी दिग्दर्शक श्रेयश जाधव 'मॅन ऑफ दि मॅच' तर स्वप्नील जोशी 'सर्वोत्कृष्ट गोलंदाज' ठरला. या मॅचमध्ये प्रियदर्शन जाधव, अभिजित खांडकेकर आणि कल्याणी मुळे यांनी सहभागी होऊन मॅचची रंगत अधिकच वाढवली.

१ फेब्रुवारीला प्रदर्शित

सामना संपल्यावरही 'मी पण सचिन'च्या टीमने या मुलांसोबत वेळ घालवला. सर्वसामान्य घरातून आलेली ही मुलं अतिशय उत्कृष्ट क्रिकेट खेळतात, त्यात आम्हाला भावी भारतीय टीम दिसते, अशी कौतुकाची थाप या वेळी 'मी पण सचिन' च्या टीमने दिली. या टीमला 'मी पण सचिन' टीमतर्फे प्रोत्साहनपर सिझन बॅट भेट म्हणून दिली. सोबतच त्यांना 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' असा सकारात्मक विचार असलेला प्रेमळ सल्लाही दिला. हा सिनेमा १ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा -

स्वातंत्र्यवीरांच्या रूपात मराठी स्टार्स!

Movie Review : जीवनाचं सूत्र सांगणारा रहस्यपट


पुढील बातमी
इतर बातम्या