Advertisement

Movie Review : जीवनाचं सूत्र सांगणारा रहस्यपट


Movie Review : जीवनाचं सूत्र सांगणारा रहस्यपट
SHARES

एखादा रहस्यमय चित्रपट बनवायचा म्हटलं की, बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कॅरेक्टर्सपासून, पार्श्वसंगीतापर्यंत आणि लोकेशनपासून सादरीकरणापर्यंतबरोबरच कथेच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंतचा ग्राफ नीट जुळून आला तर तो उत्तम रहस्यपट बनतो. 'कृतांत' या सिनेमाच्या निमित्ताने दत्ता भंडारे या नवोदित दिग्दर्शकाने जीवनाचं सूत्र सांगत अभासी जगतातील गूढ उकलण्याचा प्रयत्न केला आहे.

'कृतांत' म्हणजे काय तर नियती असा साधा सोपा अर्थ या चित्रपटात सांगण्यात आला आहे. त्याला रहस्यमयी घटनांची जोड देत उत्कंठा वाढवण्यात आली आहे. नव्या-जुन्या कलाकारांचा अभिनय आणि रहस्यपटांसाठी आवश्यक असलेल्या लोकेशनच्या आधारे दत्ताने पहिल्याच सिनेमात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.


आजच्या शर्यतीच्या युगात आपलेपणच हरवल्यानं यंत्रवत जीवन जगणाऱ्या तरुणाची कथा या सिनेमात आहे. अॅड एजन्सीमध्ये काम करणाऱ्या सम्यकला (सुयोग गोऱ्हे)कामापुढे दुसरं काहीच सुचत नसतं. पत्नी रेवा (सायली पाटील)आणि आईसोबत (विद्या करंजीकर) प्रेमाचे दोन शब्द बोलायलाही त्याच्याकडे वेळ नसतो. एक दिवस त्याचे मित्र पिकनिकचं आयोजन करतात आणि जबरदस्तीने का होईना सम्यक पिकनिकला जायला तयार होतो. मित्र पुढे जातात आणि सम्यक नंतर बसने जातो. सम्यकला आणायला येणाऱ्या मित्रांची गाडी बिघडते. गावातील एकाकी रस्त्यावर अंधार पडू लागल्यावर सम्यकला एक अवलिया (संदिप कुलकर्णी) भेटतो. मित्र येईपर्यंत तो सम्यकला आपल्या खोपटात थांबायला सांगतो. गप्पांच्या ओघात अनाहुतपणे तो सम्यकला आनंदी जीवनाचं सूत्र सांगतो. यासोबतच तो एक गोष्टही सांगतो. नंतर त्या गोष्टीसारखंच आपल्यासोबतही घडतंय असं सम्यकला वाटतं, पण तो जेव्हा भानावर येतो तेव्हा त्याला वास्तवाची जाणीव होते.


दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न

दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न करताना दत्ताने एक वेगळा विषय निवडला आहे, पण त्या विषयाला अनुरूप शेवट मात्र पाहायला मिळत नाही. बरेच प्रश्न आधांतरीच राहतात. लोकेशन्स, पार्श्वसंगीत, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या माध्यमातून सिनेमात रहस्य निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला असला तरी क्लायमॅक्समध्ये गोंधळ झाल्याने केलेली मेहनत वाया जाते. आज धावणाऱ्या प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी थांबण्याची गरज आहे. कुठे थांबायचं हे आपण ठरवलं पाहिजे. यासोबतच आपल्या कुटुंबियांनाही वेळ द्यायला पाहिजे हे सुयोग आणि संदिपने साकारलेल्या दोन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.



गतीचं भान राखण्याची आवश्यकता

चित्रपट सुरू झाल्यावर आपण काहीतरी भन्नाट आणि वेगळा अनुभव घेणार असल्याची चाहूल लागते आणि कुतूहल वाढू लागतं. संदिप कुलकर्णीने साकारलेल्या अवलियाची एंट्री होते आणि रहस्य अधिकच गडद होत जातं, पण या सर्वांमध्ये गतीचं भान राखण्याची आवश्यकता होती. रहस्यपटाला वेग असणं गरजेचं असतं, पण इथे ते होत नाही. त्यामुळे उत्सुकता असूनही पुढे घडणाऱ्या घटना तितक्या वेगाने समोर येत नाहीत. गाणी ठीक आहेत. 'थांब थांब थोडं थांब...' हे सिनेमाच्या आलेलं गाणं चांगलं झालं आहे. इतर तांत्रिक बाजूही चांगल्या आहेत.


अनोखा गेटअप

सर्वच कलाकारांची कामं चांगली झाली आहेत. संदिप कुलकर्णीने साकारलेला अनोख्या गेटअपमधील अवलिया खूपच वेगळा आणि लक्षवेधी आहे. तो भटका असल्याने त्याला एकाच ठराविक भाषेचा लहेजा नाही. संदिपने पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेला साजेसं काम केलं आहे. सुयोग गोऱ्हे एक चांगला अभिनेता असून, उत्तरोत्तर त्यात सुधारणा होत असल्याचं जाणवतं. त्याने सम्यकच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतल्याचं सिनेमा पाहताना लक्षात येतं. सायली पाटील, विद्या करंजीकर, फैझ यांनीही आपली कामं चोख केली आहेत.


या सिनेमाचा शेवट आणखी रोमांचक होण्याची आवश्यकता होती, पण रहस्यमयी दुनियेची सफर करताना जीवनाचं सूत्र समजून घेत, कुठे थांबायला हवं हे जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा पाहायला हवा.

दर्जा : **१/२ (या चित्रपटाला अडीच स्टार देण्यात यावेत)
......................................................

निर्माते : मिहीर शाह

दिग्दर्शक : दत्ता भंडारे

कलाकार : संदीप कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे, सायली पाटील, विद्या करंजीकर, फैझ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा