चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता सर्वांना 'घाबरवणार'

आतापर्यंत तुम्ही स्वप्नील जोशीला रोमँटिक चित्रपटात भूमिका साकारताना पाहिलं असेल. पण पहिल्यांदाच तुम्हाला तुमचा आवडता चॉकलेट बॉय हॉरर चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘जीसिम्स’ स्टुडिओचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेल्या चित्रपटात तो झळकणार आहे. 'बळी’ असं या चित्रपटाचं नाव असून या सिनेमाचे नुकतेच पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

'बळी' या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असं त्यातून प्रतीत होतं. सिनेमा २०२० साली प्रदर्शित होणार असल्याचंही पोस्टरमधून कळून येतं. हे पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाची नक्की कथा काय असेल? आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार आहे? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तर चित्रपट पाहिल्यानंतर कळतील. त्यामुळे प्रेक्षकांना २०२० पर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.

स्वप्नील म्हणाला की, मी हॉरर चित्रपटांच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. हा चित्रपट मला माझ्या आवडीच्या लोकांबरोबर करायची संधी मिळत असल्याचा अधिक आनंद आहे. कार्तिक आणि अर्जुन हे निर्माते आणि विशाल हे दिग्दर्शक, ही या क्षेत्रातील माझी आवडती माणसं आहेत. आमची ही टीम प्रेक्षकांना चांगलीच ‘घाबरवून’ सोडेल, याची मला पूर्ण खात्री आहे.” आता स्वप्नील जोशी प्रेक्षकांना घाबरवण्यास किती यशस्वी होतोय हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेल.


हेही वाचा

उपेंद्र लिमये साकारणार वकिलाची भूमिका

क्रिती सेननचा 'पानिपत'मधील फर्स्ट लूक पाहिला का?

पुढील बातमी
इतर बातम्या