जो थांबला, तो संपला!

बदल हे जीवंत समाजाचं लक्षण मानलं जातं, तसंच बदल ही काळाची गरज आहे. या बदलाच्या बळावरच आज आपण यंत्रयुगात इतकी क्रांती घडवली आहे. इतकी की, ती मानवालाही मागे टाकू शकेल. वेगाशी स्पर्धा करणाऱ्या या युगात जो थांबला, तो संपला हे एक कटू सत्य असून, सर्वांनीच आपल्या आजूबाजूला याची अनेक उदाहरणं पाहिली असतील. हाच विचार दिग्दर्शक मंगेश जोशी या तरुण दिग्दर्शकानं ‘लेथ’ नावाचं मशीन आणि ते चालवणारे ‘जोशी’ यांच्या माध्यमातून या सिनेमात मांडला आहे.

हा सिनेमा माससाठी नसून क्लाससाठी आहे. असं असलं तरी सर्वांनीच थोडे पेशन्स ठेवून बारकाईनं हा सिनेमा पाहिला, तर तो कोणालाही समजेल आणि आवडेल असाच आहे. एक सुंदर विचार अतिशय साध्या, सोप्या, अतिशय पद्धतशीरपणे आणि लहान-सहान बारकाव्यांनिशी सादर करण्यात आला आहे. पूर्वी टाइपरायटर होते, त्यांची जागा जशी संगणकाने घेतली... फोनची जागा, जशी मोबाईलने घेतली... तशीच काळाच्या वेगवान स्पर्धेत मागे पडलेल्या लेथ मशीनची जागा जलदगतीने दर्जेदार आणि जास्त उत्पादन देणाऱ्या अॅडव्हान्स मशीनने घेतल्यावर लेथ जोशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय जोशीचं काय होतं, ते या चित्रपटात पाहायला मिळतं.

सिनेमाची सुरुवातच लेथपासून होते. लेथवर उत्पादन सुरू असतं आणि कोणीतरी आवाज देऊन ती मशीन चालवणाऱ्या विजय उर्फ लेथ जोशींना (चित्तरंजन गिरी) बोलावतं. पुढच्याच दृश्यात लेथ बंद केल्यानं जोशी बेकार झाल्याचं समजतं. जोशींच्या घरी पत्नी (अश्विनी गिरी), मुलगा दिनू (ओम भुतकर) आणि आई (सेवा चौहान) असे एकूण चार सदस्य आहेत. पत्नी खाद्यपदार्थ बनवण्याच्या लहानसहान आॅर्डर करून संसाराला हातभार लावत असते, तर मुलगाही संगणक हार्डवेअरचं काम करत असतो. डोळ्यांनी दिसत नसलं तरी जोशींची आई मात्र टीव्ही ऐकून समाधान मानत असते. जोशींची नोकरी गेल्यावर नेमकं काय घडतं? ते या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

सिनेमाचा विषय खूप चांगला आहे. दिग्दर्शनासोबतच या सिनेमाचं लेखनही करणाऱ्या मंगेशने एका वनलाईनवर खूप छान पटकथा लिहिली आहे. काही सिनेमे खूप बोलतात, पण काहीच सांगत नाही... तर काही मात्र कमी आणि मोजकंच बोलतात, पण बरंच काही सांगून जातात... हा सिनेमा दुसऱ्या वर्गातील आहे. त्यामुळे यात संवाद तसे फारच कमी आहेत. मुख्य भूमिकेतील जोशींच्या वाट्याला तर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके संवाद आहेत. पण अभिनय, सभोवताल, वातावरण आणि सादरीकरण याद्वारे खूप काही सांगण्यात आलं आहे. जोशी खूप संथ असल्याने सिनेमाची गतीही तशीच आहे. त्यामुळे मध्यंतरापूर्वी हा सिनेमा थोडा रटाळ वाटतो, पण नंतर मात्र वाऱ्याच्या वेगाने पुढेही सरकतो आणि समजतही जातो. संवाद कमी आणि मुख्य भूमिकेतील कलाकाराच्या हालचाली खूपच संथ असल्याने हा सिनेमा सर्वसामान्य प्रेक्षकांच्या पचनी पडणं थोडं अवघड वाटतं.

सुरुवातीच्या भागात आजी-नातू आणि सासू-सून यांच्यातील खुसखुशीत संवाद नकळतपणे ओठांवर हसू फुलवून जातात. एका गंभीर विषयाला घरगुती विनोदांची दिलेली ती फोडणी आहे. या सिनेमात एकीकडे लेथ बंद झाल्यानंतरही ती खरेदी करून चालवण्याचा हट्ट धरणारे जोशी आहेत, तर दुसरीकडे बदलांकडे सकारात्मकतेने पाहात स्वत:मध्ये बदल घडवत काहीतरी नवीन शिकण्याची उर्मी असलेली त्यांची पत्नी आणि मुलगा आहे. आधी पुरणपोळी करणारी जोशींची पत्नी स्वत:त बदल घडवत चायनिज बनवायला शिकते, तर केवळ संगणकाच्या हार्डडिस्क आणि चिप्समध्ये अडकून न राहता दिनू एसएमपीएसला बॅटरी लावण्याचंही काम स्वीकारत अर्थार्जनासाठी स्वत:मध्ये आवश्यक ते बदल घडवतो. एकाच कुटुंबातील दोन भिन्न टोकं अतिशय मार्मिकपणे सादर करण्यात आली आहेत.

मध्यंतरानंतरच्या एका दृश्यात जोशी लेथ विकत घेण्यासाठी आपल्या मोठ्या मालकांना (अजित अभ्यंकर) भेटतात. त्यांनी होकार दिल्यानंतर त्यांच्या अंगात अशी काही सकारात्मक उर्जा संचारते की, त्यांच्या सायकलची चाकं वाऱ्याशी स्पर्धा करू लागतात. त्यावेळी सायकलच्या हँडलला लटकवलेल्या रिकाम्या पिशवीत हवा भरल्याचं दृश्य जोशींच्या मनातील भाव सांगण्यासाठी पुरेसं ठरतं. याखेरीज शेवटच्या दृश्यात जेव्हा ते डोळ्यांवर काळा चष्मा चढवतात, तेव्हा मागून हळूच भंगारवाल्याचा आवाज येतो आणि संपूर्ण सिनेमाचं सार सांगून जातो. पार्श्वसंगीत, कलादिग्दर्शन, वेशभूषा याबाबतीतही हा सिनेमा उत्तम आहे.

अशा प्रकारच्या सिनेमांसाठी कलाकारही ठरलेले असतात. चित्तरंजन गिरी आणि अश्विनी गिरी यांनी वास्तव जीवनाप्रमाणेच रुपेरी पडद्यावरही साकारलेले पती-पत्नी छान जमून आले आहेत. शीर्षक भूमिकेत चित्तरंजन यांनी अतिशय संयतपणे अभिनय केला आहे. अश्विनीने त्यांना अचूक साथ देत आपली व्यक्तिरेखाही खूप चांगल्या रीतीने खुलवली आहे. दिनूच्या भूमिकेत ओम भुतकर शोभून दिसतो. आजी सेवा चौहान यांच्यासोबतची त्याची केमिस्ट्री छान जमली आहे. अशा प्रकारचा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल प्रवाह निर्मिती, डॉन स्टुडिओज आाणि अमोल कागणे स्टुडिओज या निर्मितीसंस्थांचंही कौतुक करावं लागेल.

या सिनेमासाठी दिग्दर्शकाप्रमाणेच कलाकारांनीही विशेष मेहनत घेतली आहे. अतिशय साध्या-सोप्या पद्धतीने मांडलेला एक चांगला आणि सकारात्मक विचार जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पाहणं गरजेचं आहे.

दर्जा : *** १/२

--------------------------------

सिनेमा: लेथ जोशी

निर्माते: सोनाली जोशी, मंगेश जोशी

लेखन दिग्दर्शन: मंगेश जोशी

कलाकार: चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, अजित अभ्यंकर, ओम भुतकर, सेवा चौहान


चांगलं-वाईट समजण्याच्या वयातील ‘यंग्राड’ मुलांची गोष्ट

राजेश श्रृंगारपुरे खेळणार अाता गोट्या


पुढील बातमी
इतर बातम्या