Advertisement

चांगलं-वाईट समजण्याच्या वयातील ‘यंग्राड’ मुलांची गोष्ट

‘यंग्राड’ या सिनेमात मकरंदने उनाड मुलांची कथा सादर केली आहे. शाळेत असताना केली जाणारी दांडगाई, उनाडटप्पूपणा, बेमालूमपणे वाममार्गाच्या दिशेनं पडणारं पाऊल आणि त्या वयातील प्रेम अशी या सिनेमाच्या कथानकाची मांडणी आहे.

चांगलं-वाईट समजण्याच्या वयातील ‘यंग्राड’ मुलांची गोष्ट
SHARES

नाशिककडील भागात उनाड मुलांसाठी ‘यंग्राड’ या शब्दाचा वापर केला जातो. पौगंडावस्थेतील मुलांची कथा तशी नवीन नाही. आजवर बऱ्याच सिनेमांमध्ये वयात येणाऱ्या मुलांची कथा दाखवण्यात आली आहे. ‘काय बरोबर आणि चूक’ हे समजून घेऊन त्या दिशेनं मार्गक्रमण करण्याच्या वयात पावलं जर चुकीच्या वाटेवर पडली, तर काय भोगावं लागतं आणि वाट चुकलेली पावलं जर वेळीच योग्य दिशेला वळली तर काय घडू शकतं याचं चित्रण दिग्दर्शक मकरंद माने याने या सिनेमात केलं आहे.

पदार्पणातच मकरंदने ‘रिंगण’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पारितोषिकावर आपली मोहोर उमटवल्यामुळे ‘यंग्राड’कडून अपेक्षा वाढणं साहाजिक होतं. तसं झालंही, पण सिनेमा मात्र त्या अपेक्षांची उंची गाठण्यात तितकासा यशस्वी ठरलेला नाही. सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणेच या सिनेमात काहीतरं वेगळं आणि भन्नाट पाहायला मिळेल असं वाटत होतं.  पण पडद्यावर चित्र काही वेगळंच सांगतं. या सिनेमात मकरंदने उनाड मुलांची कथा सादर केली आहे. शाळेत असताना केली जाणारी दांडगाई, उनाडटप्पूपणा, बेमालूमपणे वाममार्गाच्या दिशेनं पडणारं पाऊल आणि त्या वयातील प्रेम अशी या सिनेमाच्या कथानकाची मांडणी आहे.या सिनेमाची कथा विक्या (चैतन्य देवरे) आणि त्याचे मित्र बाप्पा (जीवन करळकर), अंत्या (सौरभ पाडवी), मोन्या (शिव वाघ) यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली आहे. नाशिकमधील एका शाळेत शिकणारा विकास आणि त्याची यंग्राड गँग अभ्यास कमी आणि उनाडक्या जास्त करणारी आहे. पैसे कमावण्याच्या नादात ते भाई बल्लाळ सुर्वेच्या (विठ्ठल पाटील) टोळीसाठी व्यापाऱ्यांकडून वसूली करण्याचं काम सुरू करतात. अशातच विक्याची भेट तेजू (शिरीन पाटील) नावाच्या मुलीशी होते. पाहताचक्षणी विक्या तेजूच्या प्रेमात पडतो. प्रेमासाठी वसूलीगिरी सोडून सभ्य बनणाऱ्या विक्याचं प्रेमकथेत पुढे काय घडणार, याची उत्सुकता लागली असतानाच एक ट्वीस्ट येतं. शेवटचं गाणं सुरू होईपर्यंत वास्तववादी वाटणारा सिनेमा मग स्वप्नवत शेवटाकडे घेऊन जातो.

उनाडक्या, हाणामारी, नशेबाजी, टपोरीगिरी, मजनूगिरी, भाईगिरी आणि धक्कातंत्र हे सर्व पटकथेत टप्प्याटप्प्याने मांडण्यात आलं आहे. सुरुवातीला बराचसा सिनेमा चौघांच्या टवाळगिरीभोवती फिरतो, ठराविक वेळेनंतर प्रेमकथेचे रंग उधळतो, मध्यंतरानंतर सुरुवातीला केलेल्या कर्माची फळं दाखवतो आणि शेवटी सकारात्मकतेचा संदेश देत संपतो. मध्यंतरापूर्वी शाळेतील ज्या मुलाच्या मागे चौघेही धावत असतात त्याचं पुढे काय होतं? या प्रश्नाचं उत्तर सिनेमा संपला तरी मिळत नाही.

एक वाकडं पाऊल कसं संपूर्ण जीवनच पालटून टाकू शकतं हे दाखवताना जीवाला जीव देणाऱ्या शाळेतील मित्रांची गोष्ट नकळत प्रत्येकाला शाळेतील ते दिवस आठवायला लावणारी आहे. ‘मन वयात आलंय...’ हे गाणं श्रवणीय आहे. सिनेमाच्या शेवटी असलेलं ‘गोठ सांगतो श्रीरामाची...’ हे शंकर महादेवन यांच्या आवाजातील गाणंही उत्साह वाढवणारं असलं तरी कोरोओग्राफी आणि गाण्यातील निष्प्रभ अभिनयामुळे प्रभावहीन वाटतं. कॅमेरावर्क चांगलं आहे. संकलनात काही दृश्यांना कैची लावण्याची गरज होती.

या सिनेमातील आघाडीचे सर्वच कलाकार नवखे असले तरी त्यांचा अभिनय अनुभवी कलाकारांसारखा आहे. विक्याच्या भूमिकेत चैतन्य देवरे प्रभावी ठरला आहे. याखेरीज ‘यंग्राड’ गँगमधील जीवन करळकर, सौरभ पाडवी आणि शिव वाघ यांचंही काम छान झालं आहे. नायिका असलेल्या शिरीन पाटीलच्या वाट्याला फार मोठी भूमिका नसली, तरी तिने आपलं काम चोख बजावलं आहे. शशांक शेंडे यांनी पिचलेल्या पित्याची भूमिका साकारताना ती वास्तववादी वाटेल याकडे लक्ष दिलं आहे. त्यांच्या जोडीला सविता प्रभुणे, शरद केळकर, शंतनू गंगणे, मोनिका चौधरी यांनीही चांगलं काम केलं आहे.


चांगलं किंवा वाईट निवडण्याच्या वयातील मुलांची ही गोष्ट बरंच काही सांगून जाते. वाईटाचा शेवट अंधकारमयच आहे, पण तिथंही एक किरण सकारात्मकतेकडे नेणारा असतो. त्या दिशेने वाटचाल केली, तर जीवन प्रकाशमय होऊ शकतं, हे या सिनेमात ‘यंग्राड’ मुलांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.

दर्जा : *** 

........................................

निर्माते - विठ्ठल पाटील (विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स), गौतम गुप्ता, गौरव गुप्ता (फ्युचरवर्क्स मिडीया लिमिटेड), मधु मंटेना (फँटम)

दिग्दर्शक - मकरंद माने

पटकथा - मकरंद माने, शशांक शेंडे, अझीझ मदारी

कलाकार - शरद केळकर, शशांक शेंडे, सविता प्रभुणे, चैतन्य देवरे, शिरीन पाटील, विठ्ठल पाटील, शंतनू गंगणे, जीवन करळकर, सौरभ पाडवी, शिव वाघ, मोनिका चौधरी, निकिता पवारहेही वाचा -

मराठमोळ्या युवराजची इंग्रजी सिनेमाकडे गरुडझेप!

‘बिग बॉस’मध्ये पहायला मिळणार पूल व्हाॅलीबाॅल 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा