मराठमोळ्या युवराजची इंग्रजी सिनेमाकडे गरुडझेप!

युवराजकुमार या मराठमोळ्या तरुणानं चतुरस्र कामगिरी करत थेट इंग्रजी भाषेत सिनेमा बनवण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. मुंबईतच राहणारा युवराज कुमार हा तरुण सध्या ‘आयसिस २’ या इंग्रजी-हिंदी भाषेतील बायलँग्वल सिनेमाच्या कामात व्यग्र आहे.

  • मराठमोळ्या युवराजची इंग्रजी सिनेमाकडे गरुडझेप!
  • मराठमोळ्या युवराजची इंग्रजी सिनेमाकडे गरुडझेप!
SHARE

आज बऱ्याच मराठमोळ्या तरुण-तरुणींनी नेत्रदीपक कामगिरीच्या बळावर खऱ्या अर्थानं मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकवला आहे. इंग्रजी सिनेमा बनवणाऱ्या युवराज कुमारचं नावही आता या यादीत सामील झालं आहे. मराठी तरुण-तरुणींमध्ये खूप टॅलेंट आहे, पण त्याचा योग्य वापर केला गेला पाहिजे. योग्य संधी मिळाली तर मराठी मुलं कोणतंही काम करायला मागेपुढे पाहत नाहीत. याचा प्रत्यय वेळोवेळी आपल्याला येत असतो. याचं आणखी एक उदाहरण लवकरच समोर येणार आहे.


युवराजकुमार या मराठमोळ्या तरुणानं चतुरस्र कामगिरी करत थेट इंग्रजी भाषेत सिनेमा बनवण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. मुंबईतच राहणारा युवराज कुमार हा तरुण सध्या ‘आयसिस २’ या इंग्रजी-हिंदी भाषेतील बायलँग्वल सिनेमाच्या कामात व्यग्र आहे. याबाबत ‘मुंबई लाईव्ह’शी एक्सक्लुझिव्ह संवाद साधत इंग्रजी सिनेमा बनवण्याबाबतचे आपले विचार व्यक्त केले...


व्हिसलिंग वुड्सचा विद्यार्थी

सुभाष घईंच्या ‘व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल’मधून एडिटिंगचं प्रशिक्षण घेत अभिनय, दिग्दर्शन, सिनेनिर्मिती या फिल्ममेकिंगच्या विविध अंगांचा युवराज कुमारने बारकाईने अभ्यास केला. त्यासोबतच सिनेनिर्मितीचंही तंत्र आत्मसात केलं.


यापूर्वी काय केलं?

युवराजने यापूर्वी ‘आयसिस - एनिमिज आॅफ ह्युमॅनिटी’ या सिनेमाचं दिग्दर्शन, निर्मिती, अभिनय आणि संकलन केलं आहे. वर्ल्ड पॅालिटिक्सचा विद्यार्थी असल्यानं युवराजनं या विषयाचा खोलवर अभ्यास केला. यातूनच ‘आयसिस’सारख्या सिनेमाद्वारे जागतिक पातळीवरील आतंकवादाचा पर्दाफाश करण्याचा विचार आपल्या मनात आल्याचं युवराज म्हणाला.


अशी सुचली कल्पना

सिनेमाच्या संकल्पनेबाबत युवराज म्हणाला की, मुंबईवर केवळ नऊ मुलांनी दहशतवादी हल्ला केला. नऊ जणांनी अख्ख्या मुंबईला वेठीस धरत सर्वसामान्यांसोबतच पोलिसांच्याही हत्या केल्या आणि स्वत:ही मेले. लोकं त्यांना घाबरत होती, पण त्यांना मरणाची जराही पर्वा नव्हती. हे नेमकं काय आहे, हे शोधण्यासाठी दहशतवादावर आधारित असलेल्या पुस्तकांचा अभ्यास सुरू केला. त्यातून त्यांचे मौलाना त्यांना काय सांगतात, हे समजलं. त्याची सांगड फिक्शनशी घालून ‘आयसिस’ सिरीज बनवण्याची संकल्पना सुचली.


कानमध्ये दाखवला ‘आयसिस’

‘आयसिस’ या सिनेमाचा विषय जागतिक पातळीवरील प्रेक्षक आणि अभ्यासकांपर्यंत पोहोचावा, यासाठी युवराजने कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही या सिनेमाचा स्वतंत्र शो दाखवला. यासाठी त्याने तिथल्या अभ्यासक, परीक्षक आणि प्रेक्षकांना आमंत्रित केलं. त्यावेळी त्याचं खूप कौतुकही झालं.


‘आयसिस २’ इंग्रजीतच का?

‘कान’मध्ये ‘आयसिस’ सिनेमा दाखवल्यानंतर दुसरा भाग इंग्रजीत बनवण्याचा निर्णय घेण्याबाबत युवराज म्हणाला की, ‘आयसिस’ हा सिनेमा इंग्रजी सबटायटल्ससोबत हिंदीत दाखवण्यात आला होता. कानमध्ये गेल्यावर तिथे भारतीय सिनेमे पाहायला जास्त प्रेक्षक का येत नाहीत, ते समजलं. सिनेमात गाणी असतात. त्यासोबत भारतीय सिनेमांचा विषय काहीसा त्यांच्या आकलनापलीकडचा असतो, याची जाणीव झाली. यात प्रामुख्याने भाषेचाही प्रभाव पडत नाही. त्यामुळे ‘आयसिस २’ हा सिनेमा इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला.


काय पाहायला मिळेल?

आयसिस या संघटनेमध्ये सर्व देशांमधून आलेल्या फायटर्सचा समावेश असतो. यात अमेरिका, कॅनडा, बेल्जियम, भारत, रशिया, जर्मनी, फ्रान्स, यूके, स्वीडन, नॅार्वे, आॅस्ट्रिया आदी देशांमधील नागरिक असतात. जिहादच्या नावाखाली ते यूकेमध्ये एकत्र आले होते. त्यांची संख्या हजाराच्या आसपास होती. त्यापैकी केवळ ५०० परतले. आजही यूकेमध्ये ५०० फिरत असल्याची माहिती मिळाली आहे. यांची नेमकी आयडीआॅलॅाजी काय होती‌? आता ते काय करत असतील? आणि जगाने त्यावर कसं रिअॅक्ट व्हायला हवं, हे ‘आयसिस २’मध्ये पाहायला मिळेल.


वर्षभरात पूर्ण होईल...

‘आयसिस २’ या सिनेमाचं चित्रीकरण मुंबईसह हिमाचल प्रदेश, चेन्नई आणि कर्जतमध्ये करण्यात आलं आहे. हेमंत केळकरची पटकथा असलेल्या या सिनेमाचं संवादलेखन हरीश भिमानी यांनी केलं आहे. विमान अपहरणावर आधारित असलेल्या या सिनेमात युवराजसह रशीद नाझ, रिप्पी कौल, मनीषा केळकर, हरीश भिमानी, राहुल देव, रवी खन्ना आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. छायालेखन आकाश राज यांचं आहे.


हेही वाचा -

मराठमोळी मनिषा इंग्रजी सिनेमात

Exclusive: अभिनेत्री मृण्मयीचं दिग्दर्शनात पदार्पण!संबंधित विषय
ताज्या बातम्या