Advertisement

मराठमोळी मनिषा इंग्रजी सिनेमात

वास्तववादी घटनांना मनोरंजकमूल्यांची जोड देत ‘इसीस २’ हा इंग्रजी भाषेतील सिनेमा आकाराला येत आहे. युवराज कुमार या तरुण अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या सिनेमात मनिषा केळकर बंगाली तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठमोळी मनिषा इंग्रजी सिनेमात
SHARES

मराठमोळी अभिनेत्री मनिषा केळकर आता इंग्रजी सिनेमात दिसणार आहे. ‘इसीस २’ या सिनेमातील भूमिकेसाठी सध्या ती बंगाली भाषेचे धडे गिरवत आहे.

अलीकडच्या काळात वास्तववादी सिनेमांची संख्या वाढली आहे. वास्तववादी घटनांना मनोरंजकमूल्यांची जोड देत ‘इसीस २’ हा इंग्रजी भाषेतील सिनेमा आकाराला येत आहे. युवराज कुमार या तरुण अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या सिनेमात मनिषा बंगाली तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रथमच इंग्रजी सिनेमात काम करण्याचा अनुभव मनिषाने ‘मुंबई लाइव्ह’शी शेअर केला.


विमान अपहरणावर आधारित

‘इसीस २’ ची कथा विमान अपहरण आणि अतिरेकी कारवायांवर आधारित आहे. युएसमधून भारतात यायला निघालेल्या विमानाचं अतिरेकी अपहरण करतात. त्यानंतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांची कथा ‘इसीस २’ मध्ये आहे.


पहिलाच इंग्रजी सिनेमा

मनिषाने आजवर बऱ्याच मराठी सिनेमांसोबत काही हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. पण ‘इसीस २ ’च्या निमित्ताने ती प्रथमच इंग्रजी सिनेमात काम करत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचा पहिला भाग हिंदीत बनला होता.  परंतू दुसरा भाग इंग्रजीत चित्रीत करून हिंदीत डब करण्यात येणार असल्याचं मनिषा म्हणाली.


केवळ इंग्रजी शॅार्टफिल्मचा अनुभव

मनिषाने यापूर्वी ‘इनफ इज इनफ’ या इंग्रजी आणि हिंदी अशा मिश्र भाषेतील शॅार्टफिल्ममध्ये अभिनय केला आहे. देश-विदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये या शॅार्टफिल्मचं खूप कौतुक झालं होतं. यातील भूमिकेसाठी मनिषाने स्पर्श मुंबई फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही पटकावला होता.


बंगाली भूमिकेचं आव्हान

मनिषाने आजवर कधीही बंगाली भूमिका साकारलेली नाही. ‘इसीस २’ हा सिनेमा इंग्रजी असल्याने यात मनीषाला फार बंगाली बोलायचं नाही. मनिषा अधून-मधून एखादा बंगाली संवाद बोलताना दिसणार आहे. यासाठी ती सिनेमाचे संवादलेखक राजेश भिमानी यांच्याकडून बंगालीचे धडे घेत आहे.


आनंददायी अनुभव 

या सिनेमाचं चित्रीकरण सध्या कांदिवली येथील ठाकूर कॅालेजमधील विमानाच्या सेटमध्ये सुरू आहे. चित्रीकरणाला नुकताच प्रारंभ झाला असला तरी एकूणच एक वेगळा अनुभव मिळत असल्याची प्रतिक्रिया मनीषाने दिली.


हेमंत केळकरचं पटकथालेखन

अभिनेता-दिग्दर्शक युवराज कुमारने ‘इसीस २’ ची कथा लिहिली असून, पटकथा मनीषाचा भाऊ हेमंत केळकरने लिहिली आहे. वडील राम केळकरांकडून मिळालेला लेखनाचा वारसा जपत हेमंतने या इंग्रजी सिनेमाची पटकथा लिहिली आहे.


जागतिक पातळीवरील प्रेक्षकांसाठी

‘इसीस २’ चा दिग्दर्शक आणि बरेचसे कलाकार भारतीय असले तरी हा सिनेमा इंग्रजीत बनवण्याबाबत मनिषा म्हणाली की, इंग्रजी भाषेतील सिनेमा जागतिक पातळीवरील प्रेक्षकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो. या सिनेमाचा विषय ग्लोबल असल्याने त्याला तशी ट्रीटमेंट देण्यात आली आहे. हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध सिनेमहोत्सवांमध्येही दाखवला जाणार आहे.हेही वाचा -

‘बिग बॉस’ च्या सदस्यांना टोचणार ‘बोचरी टाचणी’

जिया बनली डीआयडी लिटील मास्टर्सची विजेती


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा