Advertisement

Exclusive: अभिनेत्री मृण्मयीचं दिग्दर्शनात पदार्पण!

नव्या पिढीतील असे अनेक जाणते कलावंत आहेत जे अभिनायासोबतच दिग्दर्शनाचं आव्हान झेलून आपल्यातील क्रिएटीव्हीटीला वाट मोकळी करून देत आहेत. अलिकडच्या काळात ’कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘अनुराग’ यांसारख्या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारत लक्ष वेधणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे देखील यापैकीच एक.

Exclusive: अभिनेत्री मृण्मयीचं दिग्दर्शनात पदार्पण!
SHARES

पूर्वी नटांची कारकिर्द झाकोळू लागली की ते दिग्दर्शनाची नवी इनिंग खेळून सिनेइंडस्ट्रीत तग धरण्याचा प्रयत्न करायचे. पण नव्या पिढीतील असे अनेक जाणते कलावंत आहेत जे अभिनायासोबतच दिग्दर्शनाचं आव्हान झेलून आपल्यातील क्रिएटीव्हीटीला वाट मोकळी करून देत आहेत. अलिकडच्या काळात ’कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘अनुराग’ यांसारख्या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारत लक्ष वेधणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे देखील यापैकीच एक. ‘के सरा सरा’ या मराठी सिनेमातून मृण्मयी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.

मृण्मयीचा उल्लेख होताच गोड चेहऱ्याची, मृदू स्वभावाची, कोणतीही भूमिका साकारण्यात पटाईत असलेली, सुंदर अभिनेत्री अनाहुतपणे डोळ्यांसमोर येते. अभिनयानंतर ‘अनुराग’ या मराठी सिनेमाद्वारे सिनेनिर्मितीकडे वळलेल्या मृण्मयीने चक्क दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. ‘के सरा सरा’ शीर्षक असलेल्या या सिनेमाच्या निमित्ताने आलेला अनुभव मृण्मयीने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्स्लुझीव्ह बातचीत करताना शेअर केला.



फार पूर्वीच ठरवलेलं...

बरेचसे कलाकार अनावधानानं किंवा अपघातानं अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळतात, पण मृण्मयीचं तसं नाही. ‘एव्हरीथींग इज प्लॅन्ड’ असं तिच्याबाबत म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण तिने हे सर्व अगोदरच ठरवलं होतं. याबाबत ती म्हणाली की, सिनेमाचं दिग्दर्शन करायचं मी फार पूर्वीच ठरवलं होतं. मला निर्मितीही करायची होती. ती ‘अनुराग’च्या माध्यमातून केली.


मी रमतेय...

अभिनय आणि निर्मितीप्रमाणेच सिनेमाचं दिग्दर्शनही मी हसत खेळत केलं आहे. त्यामुळेच या क्षेत्रात जरी मी नवखी असले, तरी इथे रमतेय असं म्हणेन. काहीतरी नवीन करत असल्याने कॅालेज जीवनातील एनर्जी इथं मिळतं आहे. त्यामुळे काम करायला मजा येत आहे. मला काहीही ओढून ताणून करायचं नाही. त्यामुळे नॅचरली जे जमतं ते करतेय.



एक वेगळा जॅानर...

‘के सरा सरा’ या सिनेमाचा जॅानर खूप वेगळा आहे. त्याला शब्दांमध्ये बंदिस्त करता येणं शक्य नाही. या सिनेमात प्रेक्षकांचं मनोरंजन होईल असं सारं काही आहे. एक वेगळाच प्रकार या निमित्ताने प्रेक्षकांनाही अनुभवता येईल. दिग्दर्शनासोबतच या सिनेमाची कथा, पटकथा, संवादलेखनही केलं आहे.


कोणालाही फॅालो करत नाही...

मी कोणत्याही दिग्दर्शकाला फॅालो करत नाही. मला स्वत:ची एक वेगळी शैली तयार करायची आहे. प्रेक्षकांच्या मनात रुजवायची आहे. त्यासाठी मेहनत घेत असून, पुढेही हाच प्रयत्न करीत राहीन. मी कथेला फॅालो करते. कथा जसा मार्ग दाखवते तसं दिग्दर्शन करते.



यांची दिग्दर्शनशैली आवडते...

कोणालाही फाॅलो करत नसले, तरी काही दिग्दर्शकांची शैली मला नक्कीच आवडते. यात अनुराग कश्यप, गौरी शिंदे, महेश मांजरेकर, मेघना गुलजार आदी. दिग्दर्शकांची नावं घेता येतील. यांचे सिनेमे माझं लक्ष वेधून घेतात. विचार करायला भाग पाडतात.


शीर्षकाचा अर्थ...

‘के सरा सरा’ याचा ‘जे होईल ते होईल’, असा अर्थ मला अभिप्रेत आहे. या सिनेमात दोन जोडप्यांची गोष्ट पाहायला मिळेल. हा सिनेमा पती-पत्नीच्या रिलेशनशीपवर आधारलेला आहे. नुकतंच लग्न झालेल्या पती-पत्नीच्या आयुष्यातील पहिल्या रात्री एक प्रसंग घडतो आणि त्यातून हा सिनेमा पुढे सरकतो.


अशी जमली टीम...

या सिनेमात अंकित मोहन, सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली, रेणुका दफ्तरदार आणि क्रेसी व इयान हे फ्रान्समधील कलाकार आहेत. स्मिता गानू आणि विजय गानू यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून, कॅमेरा अभिजीत आब्दे यांनी हाताळला आहे. या सिनेमातील गीतांना सिद्धार्थ-सौमिल यांनी संगीत दिलं आहे.



हेही वाचा-

भरकटलेल्या संजूबाबाची खरीखुरी कहाणी!

'दबंग ३'मध्ये झळकणार महेश मांजरेकरांची कन्या अश्वमी?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा