Advertisement

लाडावलेल्या, भरकटलेल्या संजूबाबाची खरीखुरी कहाणी!


लाडावलेल्या, भरकटलेल्या संजूबाबाची खरीखुरी कहाणी!
SHARES

आजवर अनेक बायोपिक आले, पण वादग्रस्त अभिनेता संजय दत्तवर आधारित सिनेमा आणि राजकुमार हिरानी यांचं दिग्दर्शन यामुळे ‘संजू’नं सर्वांचीच उत्सुकता वाढवली होती. या सिनेमात संजूबाबाचा फिल्मी सफर पाहायला मिळेल, त्याच्या अफेअर्सची चर्चा होईल, पण हे सर्व एककल्लीपणे दाखवलं जाईल, अशी बऱ्याच जणांची अपेक्षा होती. पण तसं काहीच झालं नाही. हिरानी यांनी या सिनेमात संजयचे बरे-वाईट असे सर्वच गुण दाखवत त्याच्या आयुष्याकडे तटस्थपणे कटाक्ष टाकणारा सिनेमा बनवला आहे.


हा सिनेमा ‘फिल्मी’ संजूबाबाची कहाणी सांगणारा नसून 'फील मी' असं म्हणत आपलं जीवनगाणं गाणाऱ्या नर्गिस-सुनील दत्त यांच्या लाडावलेल्या मुलाची आहे. स्टार आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने मनावर आलेलं दडपण... त्यातच वडिलांनी नेहमी मुलींनाच दिलेलं प्रोत्साहन... यामुळे लाडावलेला संजय कशाप्रकारे वाममार्गाला लागला आणि भरकटत गेला, हे या सिनेमात धाडसानं दाखवण्यात आलं आहे.

सिनेमाची सुरुवात स्वत:चं आत्मचरीत्र लिहून घेण्यासाठी एका लेखकाच्या शोधात असणाऱ्या संजय दत्तपासून (रणबीर कपूर) सुरू होते. संजयची पत्नी मान्यता (दिया मिर्झा) देखील त्याला या कामी मदत करत असते. विनी डायस (अनुष्का शर्मा) या विदेशी लेखिकेकडून ते आत्मचरित्र लिहून घ्यायचं ठरवतात. पण विनी मात्र ऐय्याश, बिघडलेल्या, बरेच आरोप असलेल्या संजयचं चरित्र लिहायला नकार देते. यात झुबिन मिस्त्री (जिम सर्भ) हा संजयचा जुना मित्र खतपाणी घालत संजयबाबत नको नको ते विनीच्या मनात भरवतो. पण त्यातूनच विनीला संजयची कहाणी उलगडत जाते. नर्गिस (मनीषा कोईराला) यांचा आजार बळावत असल्याने सुनील दत्त (परेश रावल) आणि संजय त्यांना उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जातात. तिथे त्याला कमलेश कपासी (विकी कौशल) नावाचा तरुण भेटतो. तो नंतर कसा संजयचा मित्र बनतो आणि पावलोपावली त्याला मदत करतो हे ऐकताना विनीही संजयच्या कथेत अनाहुतपणे गुरफटत जाते.

या सिनेमात संजयचं करियर नसून त्याचं खासगी आणि वादग्रस्त आयुष्य दाखवण्यात आलं आहे. भीती, न्यूनगंड, मानसिक दडपण यामुळे संजय कसा ड्रग्स अॅडिक्ट बनला. भाईंच्या धमक्यांमुळे कसा स्फोटात अडकत गेला. स्वत:चा आणि कुटुंबियांचा बचाव करण्यासाठी शस्त्र बाळगल्यानं कसा 'टाडा'मध्ये गोवला गेला,  3५० मुलींसोबतच मित्राच्या गर्लफ्रेंडशीही संबंध ठेवले, आई मृत्यूशय्येवर असतानाही ड्रग्ज घेतले हे दाखवतानाच संजय आणि सुनील दत्त यांचं नातंही या सिनेमात अधोरेखित करण्यात आलं आहे. या जोडीलाच अमेरिकेतील संजयच्या एका मित्राने कोणत्या पातळीवर जाऊन त्याला सहकार्य केलं हेही आहे. यात संजयच्या करियरचा भाग अल्प आहे. याशिवाय दत्त कुटुंबातील इतरांचा तसंच राजकारणाचाही उल्लेख नाही. हा सिनेमा पूर्णपणे संजय दत्तवर फोकस करणारा आहे.

राजकुमार हिरानी लेखन-दिग्दर्शन करताना खूप बारीकसारीक गोष्टींद्वारे लक्ष वेधून घेतात हे यापूर्वीही सर्वानी पाहिलं आहे. या सिनेमातही यासाठी त्यांनी काही विशेष शब्दांचा आधार घेतला आहे. त्यामुळे प्यार की झप्पीप्रमाणेच या सिनेमातील इटीयां, घपाघप, टायगर, सेक्स पीयर, होल यांसारख्या शब्दांचाही तरुणाईच्या बोलीभाषेत समावेश होईल यात शंका नाही.

सुनील दत्त यांच्या जीवनाचं सार गाण्यांमध्ये दडलं होतं. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. संजयला पुन्हा यशस्वी झालेलं त्यांना पाहायचं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनातील यशाचा मंत्र संजयला दिला. ज्या गाण्यांनी त्यांना नेहमी मार्ग दाखवला त्यांना ते उस्ताद म्हणायचे. याच उस्तादांचं मार्गदर्शन घेत जीवन जगायला त्यांनी संजयलाही शिकवलं. ना सर झुका के जिओ...’, ‘दुनिया में जीना है तो काम कर प्यारे...’ आणि ‘कुछ तो लोग कहेंगे...’ ही तीन गाणी म्हणजे जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र असल्याचं सांगत सुनील दत्त यांनी संजयचा मार्ग सुखकर बनवला. हे अतिशय मार्मिकपणे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

आरडीएक्सने भरलेल्या ट्रकचा मुद्दा आणखी स्पष्टपणे मांडण्याची गरज होती, पण त्यावर जास्त खोलात जाऊन स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मीडियावर प्रहार करण्यात आले आहेत. संजयच्या अडकण्यामागे मीडियातील बातम्या आणि अफवांचा हात असल्याचं यात स्पष्टपणे म्हटलं आहे. सिनेमाच्या शेवटी असलेलं ‘बाबा बोलता है अब बस हो गया...’ हे गाणंही मीडियाला उद्देशूनच आहे. लेखन, संकलन, लोकेशन या सर्वच बाबतीत हा सिनेमा वरचा क्लास गाठणारा आहे. 'मै बढीया तू भी बढीया...' आणि 'कर हर मैदान फतेह...' ही गाणी छान झाली आहेत. विक्रम गायकवाड यांच्या जादूई हातांची करामत या सिनेमात पाहायला मिळते. रणबीरला संजय बनवताना त्यांनी कुठेही उणीव राहू दिली नाही.

लेखन-दिग्दर्शनाइतकंच अभिनय हेही या सिनेमाचं एक सशक्त अंग आहे. संजय दत्त साकारणं हे रणबीर कपूरच्या आजवरच्या करियरमधील सर्वात मोठं आव्हान होतं. जीवनाच्या विविध टप्प्यांवरील संजय साकारण्यात तो पूर्णपणे यशस्वी ठरल्याने त्याच्या जागी दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याचा विचारही करता येत नाही. परेश रावल यांनी साकारलेले सुनील दत्तही हुबेहूब आहेत. दुय्यम भूमिकेतही विकी कौशलला खूप चॅलेंजिंग रोल मिळाला होता. त्याने साकारलेला कमली लक्षात राहण्याजोगा आहे. याखेरीज अनुष्का शर्मा, मनीषा कोईराला, जिम सर्भ, बोमण ईराणी, सोनम कपूर, सयाजी शिंदे आदी सर्वच कलाकारांनी आपल्या प्रतिभेला साजेसा अभिनय केला आहे.

थोडक्यात काय तर हा सिनेमा खऱ्या अर्थाने संजयचा चरित्रपट आहे. यात काही चॅप्टर गाळण्यात आले असले तरी संजयचे निगेटिव्ह पॅाइंट्स मोठ्या धाडसानं दाखवण्यात आले आहेत. त्यामुळेच संजयच्याच भाषेतच सांगायचं झालं तर ‘चॅप्टर आप चुनिए, कहानी मै सुनाऊंगा’...

दर्जा : ****

सिनेमा: संजू


हेही वाचा -

वास्तवतेला स्पर्शून जाणारी प्रेरणादायी कथा!

शिलेदाराच्या असामान्य शौर्याची कथा ‘फर्जंद’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा