Advertisement

वास्तवतेला स्पर्शून जाणारी प्रेरणादायी कथा!

अरुण साधूंसारख्या लेखकाच्या साहित्यावर आधारित असलेला सिनेमा म्हणजे त्यांच्या लिखाणाइतकंच सूक्ष्म आणि तीक्ष्ण असं काहीतरी पाहायला मिळेल असं वाटतं. दिग्दर्शक केदार वैद्य यांनी ‘झिपऱ्या’ ही कादंबरी सिनेमाच्या रूपात सादर करण्याचा चांगला प्रयत्न केला असला तरी तो आणखी चांगला होण्याची अपेक्षा होती.

वास्तवतेला स्पर्शून जाणारी प्रेरणादायी कथा!
SHARES

एखाद्या गाजलेल्या साहित्यकृतीवर सिनेमा बनतो, तेव्हा उत्सुकता खूप वाढते. अशातच अरुण साधूंसारख्या लेखकाच्या साहित्यावर आधारित असलेला सिनेमा म्हणजे त्यांच्या लिखाणाइतकंच सूक्ष्म आणि तीक्ष्ण असं काहीतरी पाहायला मिळेल असं वाटतं. दिग्दर्शक केदार वैद्य यांनी ‘झिपऱ्या’ ही कादंबरी सिनेमाच्या रूपात सादर करण्याचा चांगला प्रयत्न केला असला तरी तो आणखी चांगला होण्याची अपेक्षा होती.

ही कथा आहे रेल्वे स्टेशनवर बूट पॅालिश करणाऱ्या मुलांची. पिंगळ्या (नचिकेत पूर्णपात्रे) हा या मुलांच्या टोळीचा भाई. मुलांनी कमवायचं आणि पिंगळ्याने मजा मारायची. उलट त्यांनाच मारहाण करायची. सिनेमाच्या सुरुवातीच्या दृश्यातही तेच घडतं. सिनेवेड्या अस्लमला (प्रथमेश परब) पिंगळ्या मारत असतो. इतक्यात नाऱ्या (सक्षम कुलकर्णी) मधे येतो. त्याला सोडवतो.


याच टोळीतील किसना उर्फ झिपऱ्याची (चिन्मय कांबळी) बहीण लीलावर (अमृता सुभाष) पिंगळ्याची नजर असते. बहिणीला कोणीही काहीही बोललेलं झिपऱ्याला आवडत नसतं. एक दिवस झिपऱ्या आणि पिंगळ्या यांच्यात बाचाबाची होते. झिपऱ्याच्या मागे धावणाऱ्या पिंगळ्याचा अपघाती मृत्यू होतो. त्यानंतर सर्वजण झिपऱ्यालाच भाई मानतात. बूट पॅालिशचं काम प्रामाणिकपणे करणाऱ्या झिपऱ्याच्या आयुष्यात किर्तने मास्तर (दीपक करंजीकर) येतात. ते या बूट पॅालिश गँगला सुशिक्षीत करण्याचं शिवधनुष्य उचलतात. त्यात ते यशस्वी होतात का ते सिनेमात पाहायला मिळतं.

‘झिपऱ्या’ ही कादंबरी ज्यांनी वाचली असेल त्यांना साधूंनी लिहिलेला झिपऱ्या आठवत असेल, पण इथे जर कादंबरी आणि सिनेमाची तुलना केली गेली तर गफलत होऊ शकते. सिनेमा हे वेगळं माध्यम असल्याने काही बदल आणि मनोरंजक मूल्यांचा आधार घेऊन कथानक मांडावं लागतं.



वास्तवतेला स्पर्श करणारं हे कथानक सादर करताना केदार वैद्य यांनी याची काळजी घेतली आहे. पण त्यांनी पटकथेची मांडणी अशा प्रकारे केली आहे की झिपऱ्या जरी नायक असला तरी अस्लमच जास्त भाव खाऊन जातो. कादंबरी पटकथेत उतरवताना मूळ गाभा तसाच राखण्यात यश आलं असलं तरी त्यातील आशय नेमकेपणाने मांडताना उणीवा राहिल्याचं जाणवतं.



झोपडपट्टी, रेल्वे प्लॅटफॅार्म, रेल्वे ब्रिज, रेल्वे रूळ यांसारख्या वास्तव लोकेशन्सवर चित्रीकरण करत सिनेमाला रियल टच देण्याचा सुरेख प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. सिनेमातील संवादही परिस्थिती, प्रसंग, राहणीमान याला अनुरूप आहेत. वास्तव कितीही दाहक असलं, तरी त्यातून मार्ग काढत उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळतं असा प्रेरणादायी विचार देणारा हा सिनेमा काही आघाड्यांवर चांगला झाला आहे. कॅास्च्युम, लोकेशन्स, पार्श्वसंगीत, संगीत या जमेच्या बाजू आहेत. गाणीही सिनेमात जान आणणारी आहेत.



सिनेमाचा नायक असलेल्या चिन्मय कांबळीकडून खूप अपेक्षा होत्या, पण बऱ्याच ठिकाणी तो कमी पडला आहे. काही दृश्यांमध्ये आपली छाप पाडण्याची पूर्ण संधी चिन्मयकडे होती, पण ती त्याला कॅश करता आली नाही. याउलट प्रथमेश परबने रंगवलेला अस्लम उजवा ठरतो. सक्षम कुलकर्णीने साकारलेला नाऱ्या त्याने यापूर्वी साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूपच वेगळा आणि लक्ष वेधून घेणारा आहे.



अमृता सुभाषने पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. तिने साकारलेली लीला दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहे. तिच्या वाट्याला आलेले संवादही हृदयाला भिडणारे आहेत. यासोबतच हंसराज जगताप, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, दीपक करंजीकर यांनीही चांगलं काम केलं आहे.

साहित्याचं सिनेमात माध्यमांतर करताना काही उणीवा राहिल्या असल्या तरी कलाकारांच्या अभिनयासारख्या काही जमेच्या बाजूही या सिनेमात आहेत. याहीपेक्षा अरुण साधूंच्या आकलन आणि लेखनशैलीची झलक अनुभवण्यासाठी हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

दर्जा : ***
 
...............................................

सिनेमा: झिपऱ्या

पटकथा, संवाद, दिग्दर्शन: केदार वैद्य

निर्मिती: ए. आर. डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स

कलाकार: चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अमृता सुभाष, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, अमन अत्तार, हंसराज जगताप, देवांश देशमुख, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर



हेही वाचा-

येतोय जॅान अब्राहमचा पहिला मराठी सिनेमा!

प्रेक्षकांना 'मस्का' लावण्याचा चांगला प्रयत्न



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा