Advertisement

प्रेक्षकांना 'मस्का' लावण्याचा चांगला प्रयत्न

जेव्हा एखाद्याला फसवण्यासाठी मस्का लावला जातो; तेव्हा मात्र सावध राहण्याची गरज असते. आजवर अभिनयासोबतच नाट्य दिग्दर्शनही करणाऱ्या प्रियदर्शन जाधवने आपल्या पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन करताना प्रेक्षकांनाही चांगलाच मस्का लावलाय...

प्रेक्षकांना 'मस्का' लावण्याचा चांगला प्रयत्न
SHARES

‘मस्का लावणं’ हा प्रकार कोणासाठी नवीन नाही. प्रत्येकाने कधी ना कधी, कुठं ना कुठं, कोणाला ना कोणाला तरी मस्का लावलेला असेलच. कधी स्वत: साठी, तर कधी इतरांसाठी... पण जेव्हा एखाद्याला फसवण्यासाठी मस्का लावला जातो; तेव्हा मात्र सावध राहण्याची गरज असते. आजवर अभिनयासोबतच नाट्य दिग्दर्शनही करणाऱ्या प्रियदर्शन जाधवने आपल्या पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन करताना प्रेक्षकांनाही चांगलाच मस्का लावलाय...



इतरांना मस्का लावून त्यांची संपत्ती लुटून परागंदा होणाऱ्या माया (प्रार्थना बेहरे), यादव (शशांक शेंडे) आणि चिकू (प्रणव रावराणे) यांची ही कथा आहे. लोकांना मस्का लावत जवळीक साधायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळून पळ काढायचा हा या तिघांचा नित्याचाच खेळ. यात सुरुवातीला मेहता (विद्याधर जोशी) फसतो. नंतर वडीलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेला हर्षही (अनिकेत विश्वासराव) मायाच्या जाळ्यात ओढला जातो. हर्ष अडकणार इतक्यात त्याला परितोष (चिन्मय मांडलेकर) भेटतो. त्यानंतर कथानकाला कलाटणी मिळते आणि धक्कादायक देणारा क्लायमॅक्स पाहायला मिळतो.

सिनेमाची कथा प्रियदर्शननेच लिहिली आहे. विनोदी लेखन करण्यात त्याचा हातखंडा आहेच, पण या सिनेमाच्या पटकथेत त्याने दिलेली वळणं उत्कंठावर्धक आहेत. त्यामुळे पूर्वार्धातील सिनेमाची कथा कुठे तरी पाहिल्यासारखी वाटत असली तरी उत्तरार्धात मात्र यू-टर्न घेत एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवते. त्यातच प्रसंगानुरूप घडणारे विनोद पोट धरून हसवतात. वास्तव परिस्थितीवर भाष्य करताना चिमटा घेण्याचा प्रयत्नही प्रियदर्शनने केला आहे. संवादही चपखल असून प्रेक्षकांना आवडणारे आहेत.



या सिनेमातील काही सीन्स खूपच भन्नाट झाले आहेत. विशेषत: हर्ष आणि परितोष यांची बारमधील भेट हास्याची कारंजी उडविणारी आहे. याशिवाय हर्ष मायाच्या घरी अचानक आलेला असताना गाफीलपणे होणारी चिकूची एंट्री काॅस्च्युम, स्टाइल, गेटअप, रंगभूषा या सर्वच बाबतीत हा सिनेमा आजच्या काळातील वाटतो. एखादी व्यक्ती पडली तर त्याला हसायला सर्वच तयार असतात, पण जेव्हा आपण स्वत: पडतो तेव्हा मात्र आपल्याला कोणीही हसत नाही ना हे पाहतो.

फसफसवीच्या खेळातही असंच आहे. दुसऱ्यांना फसवलेलं पाहून सर्वांना हसू येतं, पण आपल्याला मात्र कोणीही फसवू नये असं प्रत्येकाला वाटत असतं. हा सिनेमा जरी विनोदी असला तरी केवळ हसवाफसवीचा नाही. यातही अंडरकरंट एक मेसेज आहे, तो समजला तर फसवाफसवीच्या खेळाला आळा बसणं कठीण नाही.



मायाच्या भूमिकेत प्रार्थना बेहरे मोहिनी घालण्यात यशस्वी झाली आहे. आपल्या मोहक अदांनी घायाळ करीत पोकेमानच्या संपत्तीवर डल्ला मारणाऱ्या तरुणीची भूमिका प्रार्थनाने यशस्वीपणे साकारली आहे. या सिनेमात एक वेगळाच चिन्मय मांडलेकर पाहायला मिळतो. त्याने साकारलेला परितोष मनसोक्त हसवतोच, पण बरंच काही सांगूनही जातो. अनिकेत विश्वासराव थोडा थकल्यासारखा वाटतो, पण त्याने आपलं काम नीट केलं आहे. प्रणव रावराणेसाठी हा खूप मोठा ब्रेक असून, त्याने छान फटकेबाजी केली आहे. त्याला शशांक शेंडेंचे अचूक साथ लाभली आहे.

एकूणच ‘मस्का’च्या रूपात प्रियदर्शनने एक मजेदार सिनेमा बनवला आहे. फुल टू टाइमपास असं या सिनेमाचं वर्णन करणं चुकीचं ठरणार नाही.

दर्जा : ***1/2



हेही वाचा-

शिवरायांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा - फर्जंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा