शिवरायांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा - फर्जंद


  • शिवरायांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा - फर्जंद
SHARE

एखादा ऐतिहासिक सिनेमा बनवणं हे मोठं धाडसाचं काम मानलं जातं. पुरातन काळ उभारताना तत्कालीन बोलीभाषा, वेशभूषा, लोकेशन्स यासोबतच ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे कथा सादर करण्याचं एक वेगळं आव्हानच असतं. त्यामुळे फार कमी दिग्दर्शक अशा प्रकारचं धाडस करीत इतिहास पडद्यावर रेखाटण्यासाठी पुढे येतात. ‘फर्जंद’ या सिनेमाद्वारे लेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या दिग्पाल लांजेकरने पदार्पणातच हे धाडस दाखवलं आहे.

सुभेदार तानाजी मालुसरे (गणेश यादव) यांनी तुरळक मावळ्यांच्या साथीने जिंकलेल्या सिंहगडाच्या युद्धाने सिनेमाची सुरुवात होते. या युद्धात दगाफटका करीत सुभेदारांच्या पाठीवर वार करीत बेशक खान (समीर धर्माधिकारी) घात करतो. मराठे गड जिंकतात, पण सुभेदार गेल्याचं शल्य कायम राहतं. इकडे रयतेला शिवरायांच्या (चिन्मय मांडलेकर) राज्याभिषेकाचे वेध लागलेले असतात, तर स्वराज्याचं पश्चिम टोक असुरक्षित असताना राज्याभिषेक करवून घेणं शिवरायांना मान्य नसतं. मराठ्यांच्या पोरी-बाळींच्या सुरक्षेची चिंता राजमाता जिजाऊंनाही (मृणाल कुलकर्णी) सतावत असते. त्यामुळे जोवर पन्हाळा स्वराज्यात येत नाही, तोवर राज्याभिषेक न करण्याचा निश्चय शिवराय करतात. पन्हाळा काबीज करण्याची कामगिरी कोंडाजी फर्जंदकडे (अंकित मोहन) सोपविली जाते. केवळ ६० निवडक मावळे घेऊन कोंडाजी पन्हाळ्यावर चढाई करतो. याच युद्धाची कथा या सिनेमात आहे.प्रत्येक कलाकृतीच्या जशा मजबूत बाजू असतात तशा कमकुवतही असतात. या सिनेमाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं असलं, तरी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना प्रकाशझोतात आणण्यासाठी दिग्पालने केलेल्या कामाचं कौतुक करावं लागेल. सिनेमाच्या पटकथा लेखनापासून दिग्दर्शनापर्यंत बऱ्याच आघाड्यांवर दिग्पालने स्वत: पुढाकार घेऊन काम केल्याने यातील चांगल्या-वाईट अशा दोन्ही गोष्टींसाठी बऱ्यापैकी तोच जबाबदार आहे. संवादलेखन आणि कलाकारांचा अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. या जोडीला व्हीएफएक्स, पार्श्वसंगीत, गीत-संगीत आणि लोकेशन्स या बाजूही लक्षवेधी आहेत. आजवरच्या शिवकालीन सिनेमांमध्ये केवळ शिवाजी महाराजांवर फोकस केला जायचा. पण या सिनेमात प्रत्येक मावळ्याच्या एंट्री आणि कामगिरीवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.

सिनेमाची लांबी ही सर्वात मोठी उणीव आहे. काही दृश्ये बरीच लांबली आहेत. पन्हाळा सर करण्याच्या मोहिमेवर निघालेल्या कोंडाजी आणि टिमच्या तयारीवर खूप वेळ गेल्याने युद्ध पाहण्याची उत्सुकता युद्ध सुरू होण्यापूर्वीच मावळते. एकाच सिनेमात सारं काही दाखवण्याचा अट्टाहास आणि संकलनातील ढिलाई याला जबाबदार आहे. युद्ध संपल्यानंतरही मावळतीचे रंग दाखवत शिवरायांचा फोटो फ्रेमरूपी सीन दाखवण्यातही थोडा वेळ वाया गेला आहेच. कॅमेरावर्क छान आहे. ‘शिवबा आमचा मल्हारी...’ या गीतासोबतच संस्कृतमधील इतर गीतंही सिनेमात महत्वाची भूमिका बजावणारी आहेत.

अमराठी कलाकार असूनही अंकित मोहनने साकारलेला कोंडाजी कौतुकास्पद तर आहेच, पण त्यासोबतच आश्चर्यचकित करणाराही आहे. या भूमिकेसाठी आवश्यक असणाऱ्या शरीरयष्टी इतकेच परिश्रम त्याने अभिनय, देहबोली आणि संवादफेकीवरही घेतल्याचं जाणवतं. शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकरची निवड करणं थोडं साशंक वाटतं. चिन्मयने जरी ही व्यक्तिरेखा जीव ओतून साकारली असली, तरी वेशभूषा आणि एकूणच देहबोली यातून पडद्यावर शिवराय साकारताना थोडी गफलत झाल्यासारखी वाटते. मृणाल कुलकर्णी यांनी काहीशा वेगळ्याच ढंगात जिजाऊंच्या भूमिकेत रंग भरले आहेत. प्रसाद ओकने साकारलेल्या बहिर्जी नाईकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या भूमिकेने प्रसादच्या अभिनयातील आजवर कधीही न पाहिलेले पैलू समोर आणले आहेत. मृण्मयी देशपांडेने साकारलेल्या केसरच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. कधी पायी घुंगूर बांधून नृत्य करणारी, तर कधी हाती तलवार घेऊन गनिमांशी दोन हात करणारी मृण्मयी यात पाहायला मिळते. समीर धर्माधिकारीने साकारलेला बेशक खान केवळ बोलघेवडा वाटतो. याउलट अजय पूरकर, प्रवीण तरडे, गणेश यादव, निखिल राऊत, आस्ताद काळे, राहुल मेहेंदळे, अंशुमन विचारे आदी कलाकारांनी आपापली कामं चोख केली आहेत.

थोडक्यात काय तर शिवकालीन इतिहासातील युद्ध आणि त्या काळातील परिस्थितीची जाणीव करून देणारा हा सिनेमा सहजसुंदर अभिनय, संवादलेखन आणि व्हीएफएक्सच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या स्वराज्यातील किल्ल्यांसाठी एकदा पाहायला हरकत नाही.

 Movie - Farzand
Actors - Chinmay Mandlekar, Sameer Dharmadhikari, Digpal Lanzekar, Mrunal Kulkarni, Mrunmayee Deshpande

Ratings - 3/5


संबंधित विषय
ताज्या बातम्या