‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाने जुळवली रिअल लाईफ जोडी

मराठी सिनेसृष्टीत चॅाकलेट बॅाय अशी इमेज असणाऱ्या अभिनेता अनिकेत विश्वासरावने नुकताच स्नेहा चव्हाणसोबत साखरपुडा केला. आता लवकरच ही रिअल लाईफमधील जोडी रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे.

‘हृदयात समथिंग समथिंग’ या मराठी सिनेमात स्नेहा चव्हाण आणि अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत दिसतील. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केलं आहे. नुकतीच सोशल मीडियावर अनिकेत आणि स्नेहा यांची कॅरेक्टर पोस्टर्स रिव्हील झाल्यानं या सिनेमाविषयी उत्सुकता वाढली आहे.

स्नेहा म्हणते...

अनिकेतविषयी विचारल्यावर स्नेहा म्हणाली, मी अनिकेतला ‘हृदयात समथिंग समथिंग’च्या चित्रीकरणावेळी पहिल्यांदा भेटले. या सिनेमाचं चित्रीकरण आळंदी, पुणे, मुंबई आणि गोव्याला झालं आहे. गोव्यातल्या चित्रीकरणादरम्यान आमची मैत्री झाली आणि हा सिनेमा माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.

तर अनिकेत म्हणतो...

अनिकेत स्नेहाविषयी सांगतो, स्नेहाला भेटण्यापूर्वी मी तिचं नाटक किंवा सिनेमातलं काम पाहिलं नव्हतं, पण ती मेहनती, प्रामाणिक आणि प्रतिभावान अभिनेत्री असल्याचं तिच्यासोबत काम करताना जाणवलं. गोव्याच्या चित्रीकरणादरम्यान मला आयुष्यभरासाठीची मैत्रीण मिळाली. आम्ही दोघंही खव्वय्ये आहोत. ही गोष्ट सोडल्यास आम्ही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. मी अंतर्मुख आहे, तर ती मिळून-मिसळून राहणारी, उत्साही, मस्तीखोर, साहसी मुलगी आहे.

या सिनेमात अनिकेत आणि स्नेहासोबत प्रियंका जाधव यांचीही भूमिका आहे. हा सिनेमा ५ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.


हेही वाचा - 

माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला सुरुवात

‘पलटण’मध्ये रॅायल लुकमध्ये दिसणार सोनल

पुढील बातमी
इतर बातम्या