माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला सुरुवात

शॉर्ट फिल्म अर्थात लघुपट तयार करण्याकडे तरुण कलावंतांचा ओढा वाढला अाहे. याच तरूण कलावंतांसाठी आणि निर्मात्यांसाठी माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचं (माय मुंबई इंटरनेशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल) आयोजन करण्यात आलं आहे.

SHARE

स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत सर्व विषयांना स्पर्श करण्याची ताकद बाळगणारे लघुपट हे एक प्रभावी माध्यम आहे. एखादा विषय कमीतकमी वेळात प्रेक्षकांसमोर मांडण्याची कसब लघुपटातून दाखवता येते. शेअरिंग, पर्सनल एक्स्प्रेशन, टेक्नॉलॉजी या सर्वांचा उपयोग करून आपले छोटे छोटे अनुभव व्हिज्युअल माध्यमातून व्यक्त आणि शेअर करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात एक ‘शॉर्ट फिल्म’ तयार होत असते

तशी ‘शॉर्ट फिल्म’ प्रत्यक्षात बनवणे ही गोष्ट ‘डिजिटल तंत्रज्ञान आल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सोपी झाली आहे. डिजिटल माध्यमं सर्वांच्याच हाताशी सहजगत्या उपलब्ध झाल्यानं शॉर्ट फिल्म अर्थात लघुपट तयार करण्याकडे तरुण कलावंतांचा ओढा वाढला अाहे. याच तरूण कलावंतांसाठी आणि निर्मात्यांसाठी माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचं (माय मुंबई इंटरनेशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल) आयोजन करण्यात आलं आहे


फिल्ममेकर्सना संधी

जगभरातील १५० पेक्षा अधिक शॉर्ट फिल्म्सचे स्क्रीनिंग इथं होणार आहे. फिल्ममेकर्स, निर्माते आणि कलावंतांसाठी चालून आलेली ही खास संधी आहे. या महोत्सवात फिल्ममेकर्ससाठी तज्ज्ञांचे चर्चासत्र, प्रश्नोत्तरं आणि विविध विषयांवरील कार्यशाळा अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फिल्म मेकर्ससाठी वैयक्तिक तांत्रिक अॅवॉर्ड, बेस्ट शॉर्टफिल्म फिल्म मेकर्सना रोख रकमेसहित सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे


लघुपटांच्या विविध वर्गवारी 

आंतरराष्ट्रीय स्तरांवर होणाऱ्या या महोत्सवासाठी लघुपटकारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. या महोत्सवासाठी लघुपटांच्या विविध वर्गवारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सामाजिक जनजागृती शॉर्ट फिल्म (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म (विदेशी फिल्म), अॅनिमेशनपट, कल्पनारम्य (फिक्शन) फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म), संगीतपट (म्युझिक व्हिडियो) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) अशा या सात वर्गवारीकरिता विनामूल्य ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१८ आहे. तीन दिवसीय या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.


अशी होणार विजेत्यांची निवड

या महोत्सवात सहभागी झालेल्या लघुपटांचे परीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जाईल. या महोत्सवात निवडक लघुपटांचे स्क्रीनिंग केले जाईल. प्रत्येक लघुपट वर्गवारीतून प्रत्येकी एक ‘बेस्ट शॉर्टफिल्म’ विजेता आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना वैयक्तिक तांत्रिक अॅवॉर्ड (टेक्निकल अॅवॉर्ड) देऊन गौरविण्यात येईल. लघुपट वर्गवारीतील विजेत्यांना रोख रकमेसहित आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येईल.


लोकल ते ग्लोबल

समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचं मूल्य जपणाऱ्या या महोत्सवाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आजवर जगातील ५ उपखंड, ५० हून अधिक देश आणि ३००० पेक्षा अधिक लघुपटांचा प्रतिसाद महोत्सवात मिळालेला आहे. आजवर विविध देशातील लघुपटकारांनी प्रत्यक्ष फेस्टिवलची मजा लुटली आहे. युनिव्हर्सल मराठीच्या लघुपट चळवळीला लोकल ते ग्लोबल मिळणारा प्रतिसाद हे या फेस्टिवलचे खास वैशिष्ट्य आहे. ह्या महोत्सवामध्ये चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभणार आहे.


इथं करा नोंदणी

महोत्सवाच्या www.mmisff.com या वेबसाईटवर किंवा https://filmfreeway.com/mymumbaiinternationalshirtfilmfestival या वेबसाईटवर नाव नोंदवून महोत्सवात विनामूल्य प्रवेश घेता येईल. फेस्टिवलच्या अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३/ ९९६९४१२४२६/ ९८१९५३०५६९ या क्रमांकावर तसंच ‘युनिव्हर्सल मराठी’च्या फेसबुक पेजवर संपर्क साधता येईल


फिल्ममेकर्ससाठी अमूल्य पर्वणी

लघुपट चळवळीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'युनिव्हर्सल मराठी' आणि 'रितंभरा विश्व विद्यापीठ मालिनी किशोर संघवी कॉलेज' यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टीवलच्या आयोजनात युनिव्हर्सल मराठी टीमसोबत मालिनी किशोर संघवी कॉलेजमधील बीएमएम विभागाचा फिल्म क्लब सक्रीय भूमिका बजावत आहे. महोत्सवाचं हे सहावं वर्ष असून यंदा हा महोत्सव मुंबईच्या जुहू किनाऱ्याजवळील मालिनी किशोर संघवी शांतीप्रभा प्रेक्षागृहात पार पडणार आहे. एकूणच जगभरातील फिल्ममेकर्ससाठी ही अमूल्य अशी विनामूल्य पर्वणी आहे.हेही वाचा 

'इथे' लघुपटकारांना मिळतं हक्काचं व्यासपीठ!
संबंधित विषय
ताज्या बातम्या