Advertisement

'इथे' लघुपटकारांना मिळतं हक्काचं व्यासपीठ!

मुंबईमध्ये अनेक कलाकार सध्या लघुपट बनवण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, त्यांना आपला लघुपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे योग्य माध्यम मिळत नाही. यासाठी चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी पुढाकार घेतला.

'इथे' लघुपटकारांना मिळतं हक्काचं व्यासपीठ!
SHARES

स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत सर्व विषयांना हात घालण्याची ताकद लघुपटांमध्ये असते. एखादा विषय कमीतकमी वेळेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर लघुपट हे प्रभावी माध्यम आहे. आजपर्यंत अनेक लघुपटांमार्फत भारतीय प्रथा-परंपरा, संस्कृती जगभरात पोहोचल्या आहेत. मुंबईमध्ये अनेक कलाकार सध्या लघुपट बनवण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, त्यांना आपला लघुपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे योग्य माध्यम मिळत नाही. यासाठी चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी पुढाकार घेतला. आणि अशा नवीन होतकरू लघुपट बनवणाऱ्यांसाठी फिल्मिंगो इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात केली.


फेस्टिव्हल कशासाठी?

नोव्हेंबर २०१६ ला प्रथम फिल्मिंगो इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात झाली. लघुपट क्षेत्रात अभिनव काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे. त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि हे लघुपट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश फिल्मिंगो फेस्टिव्हलमागे आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी फेस्टिव्हलच्या आधी एक कार्यशाळा आयोजित करण्यात येते. या कार्यशाळेमार्फत स्पर्धकांना शॉर्ट फिल्मचे धडे दिले जातात. फेस्टिव्हलच्या आधी कार्यशाळा आयोजित करणारा हा भारतातील एकमेव फिल्म फेस्टिव्हल आहे.


अनेक नवनवीन मुलं लघुपट बनवण्यासाठी धडपडत आहेत. पण त्यांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर त्यांचे लघुपट देशापुरतेच मर्यादीत राहतात. या फेस्टिव्हलच्या आधी एक वर्कशॉप आम्ही घेतो. या वर्कशॉपमध्ये मुलांना कशाप्रकारे शॉर्टफिल्म बनवावी? विषय कसा निवडावा? कॅमेरा या विषयी ज्ञान दिलं जातं. त्याचबरोबर या फेस्टिव्हलद्वारे त्यांना त्यांचे लघुपट 'कान' फेस्टिव्हलला नेण्याची संधी मिळते.

अशोक राणे, आयोजक, फिल्मिंगो इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल


फेस्टिव्हलला नक्की हजेरी लावा!

या वर्षी फिल्मिंगो इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २२, २३ आणि २४ डिसेंबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट येथे भरवण्यात आला आहे. एकूण राज्यभरातून १६० लघुपट या फेस्टिव्हलसाठी आले होते. त्यातील ६० लघुपटांची यावर्षी फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली आहे. अभिनेता संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते फेस्टिव्हलचं उद्घाटन झालं.


कान फिल्म फेस्टिव्हलचं महत्त्व

या फेस्टिव्हलमधून निवडण्यात आलेले निवडक लघुपट 'कान' या अांतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येतील. 'कान' फेस्टिव्हलमध्ये भारताबरोबरच इंग्लंड, अमेरिका, अफगाणिस्तान, इराण आणि इस्त्राईल या देशातील लघुपटांचा सहभाग असतो. गेल्या वर्षी २०१६ मध्ये फिल्मिंगो इन्टरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमधून एकूण ३ लघुपटांची निवड करण्यात आली होती. या वर्षीही सर्वोत्कृष्ठ ५ लघुपटांना 'कान' फेस्टिव्हलला जाण्याची संधी मिळणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा