१४ वर्षांनी नीना कुळकर्णी पुन्हा बनल्या स्वप्नीलची आई

आजवर बऱ्याच अभिनेत्रींनी आॅनस्क्रीन आईच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यश मिळवलं आहे. याच वाटेनं जात ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनीही बऱ्याच चित्रपटांमध्ये नायकाची आई साकारली आहे. आता 'मोगरा फुलला' या आगामी मराठी चित्रपटात त्या स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत.

१४ जूनला प्रदर्शित 

ज्येष्ठ दिग्दर्शिका श्रावणी देवधर दिग्दर्शित 'मोगरा फुलला' हा चित्रपट १४ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा म्हणजेच 'मोगरा फुलला'! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नील जोशीच्या खंबीर आईची भूमिका नीना कुळकर्णी यांनी साकारली आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये स्वप्नीलचा आपल्या आईसोबतचा म्हणजेच नीना कुळकर्णींबरोबरचा लुक रिव्हील करण्यात आला आहे. 'आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ...' ही या पोस्टरवरील सुंदर ओळ माय-लेकरातील मायेचं आणि जिव्हाळ्याचं नातं अधोरेखित करणारी आहे.

संवेदनशील कथा

या सिनेमाच्या निमित्तानं स्वप्नीलच्या आईची भूमिका साकारण्याबाबत नीना म्हणाल्या की, मी सेटवर काम करत असताना खुश होते. कारण या चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी माझी जुनी मैत्रीण आहे. स्वप्नीलबरोबर पुन्हा १४ वर्षांनी काम करायला मिळालं. चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे या सर्वांबरोबर पुन्हा काम करायला मजा आली. 'मोगरा फुलाला' ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. या कथेमधील माझी व्यक्तिरेखा साकारताना मला खूप समाधान मिळालं.

 

पुन्हा दिग्दर्शनाकडं

या चित्रपटामध्ये स्वप्नील आणि नीना यांच्यासोबत सई देवधर, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. 'मोगरा फुलला'च्या माध्यमातून दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शनाकडे वळल्या आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. यात 'लपंडाव', 'सरकारनामा', 'लेकरू' या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.


हेही वाचा -

सागर बनला ‘भारतीय घटनेचा शिल्पकार’

कलाकारांनी तरुणाईला दिला ‘नेशन फर्स्ट’चा संदेश


पुढील बातमी
इतर बातम्या