Advertisement

कलाकारांनी तरुणाईला दिला ‘नेशन फर्स्ट’चा संदेश

पाठ्यपुस्तकात १९४७ पासून झालेल्या अनेक युद्धांच्या कथा असणं आवश्यक आहे. वायुसेनेविषयी बोलताना निवृत्त एअर मार्शल सुनील सोमण म्हणाले की, भारताचं वायुदल २४ तास अलर्ट असतं, एखादा संदेश आल्यास तीन मिनिटांच्या आत विविध विमानतळावरून अनेक विमानं तात्काळ लक्ष्याच्या दिशेनं झेप घेतात.

कलाकारांनी तरुणाईला दिला ‘नेशन फर्स्ट’चा संदेश
SHARES

पुलवामा हल्ल्यानंतर भारतवासीयांच्या मनात प्रज्ज्वलीत झालेल्या देशभक्तीची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी एकत्र येऊन ‘जागते रहो’ हा अनोखा कार्यक्रम सादर केला. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रणाम भारत कला अभियान यांच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तरुणांमध्ये ‘नेशन फर्स्ट’ची जाणीव जागृती निर्माण करण्यात आली. यासोबतच भारतीय सैन्य दलाला मानवंदना देत ‘जागते रहो’चा नारा देत नागरिकांना कायम जागृत राहण्याचं आवाहन करण्यात आलं.


देशप्रेमाची जाणीव आवश्यक

याप्रसंगी सैनिकासाठी कार्यरत असणाऱ्या लक्ष्य फाऊंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैन्यदलाचं छायाचित्र व चित्रफितीद्वारे प्रत्यक्ष वस्तुस्थितीचं दर्शन घडविलं. आपलं सैन्यदल काश्मीर, कारगिल, द्रास्, सियाचीन, अरुणाचल प्रदेश अशा अनेक खडतर ठिकाणी कसं २४ तास डोळ्यांत तेल घालून सीमेवर पहारा देतं याचं यथार्थ दर्शनही प्रभुदेसाई यांनी घडविलं. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी आपले विचार प्रगट केले. आपलं सैन्य देशरक्षणासाठी सीमेवर दिवसरात्र कार्यरत असते, या सैनिकांप्रती व देशाप्रती आपल्या मनात प्रेम असणं आवश्यक आहे. यासाठी तरुणांमध्ये देशप्रेमाची जाणीव जागृती येणं आवश्यक असल्याचं पेडणेकर म्हणाले.


योग्य सन्मान द्या 

वीरमाता अनुराधा गोरे यांनी याप्रसंगी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. युद्धामध्ये लाखो सैनिक मृत्यू व जखमी झालेले आहेत. यात जखमी सैनिक स्वत:ला अपंग मानत नाहीत. युद्धांमध्ये मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नी यांनाही भेटून त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. आम्हाला सहानुभूती देण्यापेक्षा योग्य तो सन्मान द्या असं त्या वीरमाता व वीरपत्नींचं म्हणणं आहे. सैनिक म्हणतात की, यावेळेस माझा मृत्यू झाला तरी पुढील जन्म हा सैनिकाचाच मिळाला पाहिजे,  सैनिकांमध्ये असलेली हीच भावना सर्वसामान्य जनतेमध्ये आणि तरुणांमध्ये असायला हवी. यासाठी तरुणांमध्ये देशाप्रती ‘नेशन फर्स्ट’ ही भावना निर्माण करणे आवश्यक आहे.


जाणीव आवश्यक

भारतीय सैन्य दलातील निवृत्त एअर मार्शल सुनील सोमण, निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन व निवृत्त व्हाईस अॅडमिरल अभय कर्वे यांनी सैन्यदल, वायुसेना व नौसेना मधील सैनिकांची सद्यस्थिती, त्यांचं कार्य याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी मेजर जनरल शिशिर महाजन म्हणाले की, प्रत्यक्ष युद्धानंतर आजपर्यंत भारतीय सैनिक दररोज लढाई करीत आहेत, यामध्ये मृत्यू होणाऱ्या सैनिकांची संख्या युद्धामध्ये मृत्यू पावलेल्या संख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळंच सैन्याला लोकांच्या सहानुभूतीपेक्षा त्यांच्याविषयी जाणीव असणं आवश्यक वाटतं. 


वायुदल २४ तास अलर्ट 

पाठ्यपुस्तकात १९४७ पासून झालेल्या अनेक युद्धांच्या कथा असणं आवश्यक आहे. वायुसेनेविषयी बोलताना निवृत्त एअर मार्शल सुनील सोमण म्हणाले की, भारताचं वायुदल २४ तास अलर्ट असतं, एखादा संदेश आल्यास तीन मिनिटांच्या आत विविध विमानतळावरून अनेक विमानं तात्काळ लक्ष्याच्या दिशेनं झेप घेतात. पुलवामा घटनेनंतर भारतीय वायू सेनेनं तात्काळ झेप घेऊन पाकिस्तानी हवाई हल्ल्याला परतवून लावलं.


जहाजं २४ तास 

नौदलाविषयी बोलताना निवृत्त व्हाईस अॅडमिरल अभय कर्वे म्हणाले की, समुद्रामध्ये विशेषता अरेबियन समुद्रामध्ये आपली जहाजं २४ तास तयार असतात. समुद्राला सीमा नसल्यामुळं समुद्रातील विविध प्रकारची जहाजं ओळखून त्यावर तात्काळ कारवाई केली जाते. याप्रसंगी सिने व नाट्य कलाकार अभिराम भडकमकर यांनी ‘जागते रहो’ या कार्यक्रमाची कल्पना विशद केली. ते म्हणाले की, या देशाप्रती व सैनिकांप्रती कलाकारांमध्ये जाणीव असते. म्हणूनच सिने व नाट्यक्षेत्रातून अनेक कलाकारांच्या सहकार्यामुळे ‘जागते रहो’ या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. 


देशभक्तीपर गीतं सादर

या कार्यक्रमामध्ये गायक रविंद्र साठे व इतर कलाकारांनी देशभक्तीपर गीतं सादर केली. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ रविंद्र कुलकर्णी व मुंबई विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक मुकादम यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाची संकल्पना पद्मश्री वामन केंद्रे, पुरुषोत्तम बेर्डे, प्रमोद पवार, अनंत पणशीकर, जयेंद्र साळगावकर, अभिराम भडकमकर, राजन भिसे, संजय पेठे, प्रसाद महाडकर, चंद्रशेखर सांडवे, डॉ. अमोल देशमुख, कुणाल रेगे व अभिषेक मराठे यांची आहे. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, सिने अभिनेत्री किशोरी शहाणे-विज उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे समन्वयक दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या संचालिका डॉ. शेफाली पंड्या व प्रा. मंदार भानुशे होते.



हेही वाचा - 

सागर बनला ‘भारतीय घटनेचा शिल्पकार’

…आणि २० वर्षांनी रंगभूमीवर परतले विजय पाटकर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा