Advertisement

सागर बनला ‘भारतीय घटनेचा शिल्पकार’


सागर बनला ‘भारतीय घटनेचा शिल्पकार’
SHARES

मोठ्या पडद्यानं आजवर बऱ्याच ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रं जगासमोर आणली आहेत. यात भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही समावेश आहे, पण छोट्या पडद्यानं आजवर कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र सादर करण्याचं धाडस केलं नव्हतं. मागील काही दिवसांपासून नव्या ढंगात आणि नावीन्यपूर्ण रंगात दिसणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीनं हे धाडस करीत आंबेडकरांचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर आणण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. या निमित्तानं अभिनेता सागर देशमुख आंबेडकरांच्या भूमिकेत झळकणार आहे.


सागर देशमुख बाबासाहेबांच्या रूपात 

जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख या मालिकेत बाबासाहेबांच्या रूपात भेटणार आहे. पुलंच्या व्यक्तिरेखेखेरीज यापूर्वी प्रेक्षकांनी सागरला वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहिलं आहे. या भूमिकेविषयी सांगताना सागर म्हणाला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. बाबासाहेबांचं कर्तृत्व खरच महान आहे. या भूमिकेच्या निमित्तानं मला नव्यानं बाबसाहेब उलगडत आहेत. यामुळं एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होत असल्याचं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.


महामानवाचे विचार पोचवणार

भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडलं जाणार आहे स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून. आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचं कार्य आजही तेवढंच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरतं. महामानवाचे हेच विचार जगभरात पोहोचवण्याच्या हेतूनं या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.


महामानवाचा प्रवास मालिकेत

सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रांत आपल्या अमोघ वक्तृत्वानं व कुशल नेतृत्वानं बाबासाहेबांनी शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. महामानवाचं हे महान कार्य मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न या मालिकेत करण्यात येणार आहे. स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या मालिकेविषयी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं गौरवशाली कार्य ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महामानवाचं हे महान कार्य मालिकेतून पोहोचवणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट तर आहेच शिवाय खूप मोठी जबाबदारीही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण ते महामानवापर्यंतचा प्रवास मालिकेत पाहायला मिळणार आहे.


१५ एप्रिलपासून मालिका

समाजव्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत बाबासाहेबांच्या मनात विलक्षण चीड होती. त्यामुळंच आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. अद्वितीय बुद्धिमत्ता, जागतिक दर्जाची विद्वत्ता, क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रचंड वाचन आणि अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांसह भीमजी रामजी आंबेडकर यांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ इथपर्यंत झाला. १५ एप्रिलपासून ही मालिका सुरू होणार आहे.हेही वाचा -

…आणि २० वर्षांनी रंगभूमीवर परतले विजय पाटकर

सयाजी-किशोरच्या ‘बाबो’चा फर्स्ट लुक पाहिला का?
संबंधित विषय
Advertisement