रिंकूच्या ‘कागर’चा ट्रेलर पाहिला का?

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना वन नाईट स्टार बनलेल्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या अभिनेत्री रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेला ‘कागर’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

२६ रोजी प्रदर्शित

आज सर्वत्र निवडणुकांचं वातावरण आहे. जुनं नेतृत्वाला थोडं बाजूला सारून नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी धुरंधर राजकारणी या निवडणुकीत कंबर कसताना दिसत आहेत. निवडणुकीच्या याच पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाचं वास्तववादी चित्र दाखवणारा रिंकूचा ‘कागर’ हा आगामी चित्रपटही रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. वायाकॉम १८ स्टुडीओज व उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित ‘कागर’ हा चित्रपट २६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

समाजकारणाचे वास्तववादी चित्रण 

‘कागर’च्या माध्यमातून रिंकू तब्बल तीन वर्षानंतर रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार’ अशा आरोळ्या देत रिंकू ‘कागर’च्या प्रचाराच्या रणधुमाळीत नव्या जोशात उतरली आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. 

रिंकूचं नवं रूप 

या चित्रपटात अभिनेते सुनील तावडे यांचा चिरंजीव शुभंकर तावडे हा रिंकूचा नायक बनल्याची ब्रेकिंग न्यूज ‘मुंबई लाईव्ह’नेच दिली होती. शुभंकरचा हा पहिलाच चित्रपट आहे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवतं ते प्रेम आणि नात्यातल्या विश्वासाला वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणतं ते राजकारण. एककीडं हळूवार प्रेम आणि दुसरीकडं राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणाऱ्या ‘कागर’च्या निमित्तानं प्रेक्षकांना रिंकूचं नवं रूप पाहायला मिळणार आहे.

 लिंक : http://bit.ly/KaaGarTrailer


हेही वाचा -

उपेंद्रच्या उपस्थितीत ‘बाळा’चं संगीत प्रकाशन

दीपिकाला मेकअपसाठी लागतात ४ तास!


पुढील बातमी
इतर बातम्या