रितेश देशमुखही म्हणतोय 'स्माईल प्लीज'

हिंदीसोबतच मराठीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सध्या आपल्या चाहत्यांना 'स्माईल प्लीज'चा सल्ला देत आहे.

जीवनाचं टॅानिक

आजच्या धकाधकीच्या आणि तणावाच्या जीवनात माणसाच्या चेहऱ्यावरील स्माईलच हरवली आहे. ही स्माईल शोधण्यासाठी मग सकाळी उठून लाफ्टर क्लब जॅाईन करून हसण्यासाठी वेळ काढला जात आहे. हास्य हे आनंदी जीवनाचं टॅानिक आहे, पण त्यासाठी वेगळा वेळ काढण्यापेक्षा प्रत्येक काम करताना जर आपण स्माईल केली, तर सर्व गोष्टी सोप्या होऊ शकतात. याचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतलाही असेल. हाच अनुभव आपल्या चाहत्यांनाही यावा यासाठीच जणू रितेश सर्वांना 'स्माईल प्लीज' म्हणत आहे.

पोस्टर  लाँच

खरं तर 'स्माईल प्लीज' नावाचा एक नवा कोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रितेशनं नुकतंच सोशल मीडियावर लाँच केलं आहे. विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लीज' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत आहे. आयुष्यातील हसण्याचे क्षण अधोरेखित करणारं हे पोस्टर निश्चितच डोळ्यांना सुखावणारं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात, परंतु त्याकडं सकारात्मकतेनं बघत, जीवनाची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे.

१९ जुलैला प्रदर्शित

जीवनाचा खडतर प्रवस सुखद करायला शिकवणारा 'स्माईल प्लीज' हा चित्रपट १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुक्ता-ललित यांच्या जोडीला प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगानं, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित 'स्माईल प्लीज' हा चित्रपट प्रेक्षकांनाही जगण्याची नवीन उमेद देऊन, चेहऱ्यावर नक्कीच स्माईल आणेल असं टीमच्या वतीनं सांगितलं जात आहे.


हेही वाचा-

ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन

अबब! चरण-एनटीआरचे ४५ कोटींचे फाइट सिक्वेन्स


पुढील बातमी
इतर बातम्या