काही सिनेमांची शीर्षक विचार करायला भाग पाडतात. कित्येकदा शीर्षकावरून चित्रपटात काय दडलं आहे याचा अंदाज येत नसल्याने उत्सुकताही वाढते. असाच एक कुतूहल वाढवणारा ‘सुलतान शंभू सुभेदार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शीर्षकातच हिंदू-मुस्लीम धर्मांचा अनोखा मिलाफ घडवून आणणारा ‘सुलतान शंभू सुभेदार’ हा चित्रपट हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल भाष्य करणारा आहे. डॉ. राज माने दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती कैलास गिरोळकर व अॅड. प्रशांत भेलांडे यांनी यश असोसिएट मुव्हीज या बॅनरखााली केली आहे. मनोरंजनासोबतच एक सशक्त सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे.
सत्य घटना
दिग्दर्शक डॉ. राज माने या चित्रपटाबाबत म्हणाले की, ‘सुलतान शंभू सुभेदार’ या चित्रपटाचं कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. त्याला कल्पनेची जोड देत अॅड. प्रशांत भेलांडे यांनी कथा गुंफली आहे. ही कथा एका मुस्लीम कुटुंबातील हरवलेल्या सुलतानची आहे. ज्याचं पालनपोषण एक हिंदू रिक्षाचालक शंभू सुभेदार करतो. आयुष्याच्या एका वळणावर या दोघांची भेट होते आणि तिथूनच शंभूचं विश्व बदलून जातं. दोघे आनंदाने जगत असतात. आयुष्याच्या एका वळणावर सुलतानचे जन्मदाते उभे ठाकतात... त्यानंतर सुलतानचं काय होतं? ते या चित्रपटात पाहायला मिळेल.
लवकरच प्रदर्शित
या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून, लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यश गिरोळकर, दिगंबर नाईक, किशोर महाबोले, देवेंद्र दोडके, जयवंत भालेकर, अॅड. प्रशांत भेलांडे, उज्वला गाडे, सिमरन कपूर, सुप्रिया बर्वे, ज्योती निसळ यांच्या सिनेमात भूमिका आहेत. गीतकार अॅड. प्रशांत भेलांडे यांनी लिहिलेल्या गीतरचना संगीतकार अरविंद हसबनीस यांनी धनश्री देशपांडे, डॉ. डहाणे, श्रीरंग भाले यांच्या आवाजात स्वरबद्ध केल्या आहेत.
हेही वाचा -
‘वय विचारू नका’ म्हणत सोनाली बनली ‘माधुरी’
नागराज-झी चा नवीन चित्रपट ‘नाळ’