‘ये रे ये रे पैसा’ चा सिक्वेल येणार

‘ये रे ये रे पैसा’ हा सिनेमा आपणा सर्वांना आठवत असेलच... आता या सिनेमाचा सिक्वेल तयार होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येईल...

या वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी म्हणजेच ५ जानेवारीला ‘ये रे ये रे पैसा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. बॅाक्स आॅफिसवर चांगली कमाई करणाऱ्या या सिनेमाचा आता सिक्वेल बनणार आहे. अमेय खोपकर, पर्पल बुल एंटरटेनमेंट आणि ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनोरमा स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘ये रे ये रे पैसा २’ चं दिग्दर्शन हेमंत ढोमे करणार आहे. याबाबत हेमंतने ‘मुंबई लाइव्ह’शी बातचित केली.

संजयकडून हेमंतकडे

‘ये रे ये रे पैसा’ चं दिग्दर्शन संजय जाधवने केलं होतं, तर सिक्वेलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी हेमंतकडे आली आहे. ही जबाबदारी मी आपलं काम पॅशनेटली करत असल्याने आली असल्याचं हेमंत म्हणतो. हेमंतच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी त्याने ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, ‘सातारचा सलमान’ या सिनेमाचं चित्रीकरण सुरू आहे.

९ आॅगस्टलाच मुहूर्त

‘ये रे ये रे पैसा’च्या चित्रीकरणाला मागच्या वर्षी ९ आॅगस्टला सुरुवात करण्यात आली होती. तीच प्रथा पुढे सुरू ठेवत ‘ये रे ये रे पैसा २’ चा मुहूर्तही ९ आॅगस्टलाच करण्याची योजना आखण्यात आली आहे. मुहूर्त मुंबईमध्येच होणार आहे.

लंडनला होणार शूट

मुहूर्तानंतर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मुहूर्तानंतर ‘ये रे ये रे पैसा २’ ची टिम लंडनला रवाना होईल. तिथे सिनेमाचा ८० ते ८५ टक्के भाग चित्रीत करण्यात येणार आहे. ऋषिकेश कोळीने या सिनेमाचं लेखन केलं आहे.

चांगलं करून दाखवण्याचा दबाव

बॅाक्स आॅफिसवर यशस्वी झालेल्या ‘ये रे ये रे पैसा’ या सिनेमाचा सिक्वेल बनवण्याची आॅफर जेव्हा आली, तेव्हा थोडा थबकलोच. पटकन न घेता येणारा निर्णय होता तो. एक अॅडेड रिस्पॅान्सिबिलीटी येते. कारण पहिला भाग  कोणीतरी दुसऱ्याने केलेला असतो आणि दुसरा भाग आपण करायचा असतो. त्यामुळे चांगलं करून दाखवण्याचा दबाव असतो. पण आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणं हेच आपल्या हाती असतं.

माझ्या शैलीत बनवणार सिक्वेल

मागे काय झालं आहे याचा विचार न करता एक नवीन सिनेमा दिग्दर्शनासाठी आला आहे, अशा प्रकारे मी ‘ये रे ये रे पैसा २’ कडे पाहणार आहे. पाटी कोरी ठेवून काम केलं तरच ते चांगलं होईल असं वाटतं. एक फ्रेश सिनेमा मी माझ्या शैलीत बनवण्याचा प्रयत्न करणार. त्याचा मागच्या भागाशी काही संबंध नसेल.

संपूर्ण कथानक वेगळं

पार्ट वनचा आणि पार्ट टूशी कसलाच संबंध नाही. कथेचाही नाही. पहिल्या भागाची कथा संपली आहे. ही दुसरी कथा आहे. त्यामुळेच हा संपूर्ण नवीन सिनेमा आहे. यात फारच फरक असेल. काही व्यक्तिरेखा त्याच असतील, पण इतर बऱ्याच व्यक्तिरेखा अॅड होतील. त्यामुळे त्यांची मांडणी नव्याने असेल, ट्रीटमेंट वेगळी असेल, कॅमेरापासून सादरीकरणापर्यंत सारंच नावीन्यपूर्ण असेल.

काही कलाकार नवीन

यातील काही कलाकार तेच असतील, पण काही कलाकार बदलतील. एकूणच या सिनेमातील आधीचे कलाकार आणि नवीन येणारे कलाकार यांची सांगड घालून हा सिनेमा बनवला जाणार आहे. त्यामुळे एक वेगळंच रसायन प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अद्याप बऱ्याच गोष्टी ठरायच्या आहेत. ज्या लवकरच ठरतील.


हेही वाचा -

बिग बॅासमध्ये ‘हेल्दी स्माइल’ स्पर्धा

संहिता अन् भव्यतेचा संगम घडवा: राज ठाकरे


पुढील बातमी
इतर बातम्या