Advertisement

संहिता अन् भव्यतेचा संगम घडवा: राज ठाकरे

थिएटर्स सुधारायला हवीत यात माझं दुमत नाही, पण रसिक तिथपर्यंत येण्यासाठी नाटकांमध्ये भव्यता येणं गरजेचं असल्याचं परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणात काढले.

संहिता अन् भव्यतेचा संगम घडवा: राज ठाकरे
SHARES

नाटकांमध्ये भव्यता हवी. गोष्ट हवी. रसिकांना खिळवून ठेवणारं सारं काही हवं. ते जर मिळत नसेल तर थिएटरच्या बाथरूमपेक्षाही ती महत्त्वाची गोष्ट आहे. थिएटर्स सुधारायला हवीत यात माझं दुमत नाही, पण रसिक तिथपर्यंत येण्यासाठी नाटकांमध्ये भव्यता येणं गरजेचं असल्याचं परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणात काढले. “साखर खाल्लेल्या माणसाचा सत्कार शिव्या खाल्लेल्या माणसाच्या हातून करण्यात आला”, अशी मिश्किल प्रतिक्रिया देत त्यांनी आपल्या भाषणात रंग भरले.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ९८ व्या मराठी नाट्यसंमेलनाचा शुभारंभ मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहाच्या आवारात संपन्न झाला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे उपस्थित होते. याशिवाय स्वागताध्यक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उद्घाटक सतिश आळेकर, नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष जयंत सावरकर, वर्तमान अध्यक्षा किर्ती शिलेदार, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळीही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसाद ओकने या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.


तावडेंच्या मनात काय आहे?

नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने शरद पवारसाहेबांसोबत दुसऱ्यांदा व्यासपीठावर एकत्र आलो आहे. मागच्या वेळी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती, तेव्हा त्यांच्यासोबत आलो होतो. आम्ही सतत व्यासपीठावर एकत्र यावं याची काळजी भाजपाचे नेते विनोद तावडे कटाक्षाने घेत असतात. हा निव्वळ योगायोग नाही. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय तेच कळत नाही.


आमच्याकडे नाटकं वाढलीत...

आज आमच्याकडे नाटकं वाढलीत आणि तुमच्याकडे राजकारण, असं म्हणत राज यांनी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या राजकारणावर टीका केली. हे नाट्यक्षेत्र आहे. त्यात तुमची जबाबदारी मोठी असल्याचं सांगत कलेमध्ये राजकारण आणू नका असं त्यांनी म्हटलं. नाट्यक्षेत्रात सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टी दूर करण्याचं आव्हान प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर आहे.


हे नाटकाचं दुर्दैव

काहीजण केवळ तारखा विकत घेण्यासाठी स्वत: ची नाटक कंपनी काढतात. याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. नाटकांच्या तारखा विकण्यासाठी कंपनी काढता? नाटक करून पोट भरण्यापेक्षा तारखा विकून पोट भरता? हे खरोखरच दुर्दैवी आहे. सर्वचजण असं करतात असं नाही, पण जे करत नाहीत त्यांनी एकत्र येऊन याचा विचार करायला हवा.


काळ बदलला आहे...

आज इंटरनेटमुळे सर्वच बदललं आहे. तरुणाईची मनोरंजनाची साधनं बदलली आहेत. नाटकांना टिव्ही, इंटरनेट, सिनेमा असे बरेच पर्याय आहेत. केवळ तरुणाईच नव्हे, तर सर्वच वयोगटातील लोकांसाठी मनोरंजनाची व्याख्या बदलली आहे. जग हाताच्या बोटांवर येऊन ठेपल्याने या स्पर्धेत नाटकांनीही टिकाव धरण्याची गरज असल्याचं राज म्हणाले.


संहिता आणि भव्यतेचा संगम...

उत्तम संहितेला भव्यतेची जोड देण्याची गरज आहे. भव्यता आणि संहितेचा संगम घडवला, तर रसिक नक्कीच येतील. मग तिथे तिकिटांचे दर जास्त असले तरी चालतील. मुघल-ए-आझम हे नाटक त्याचं ताजं उदाहरण आहे. त्या नाटकाच्या तिकिटाचे दर पाच हजार रुपये आहेत. तरीही रसिक येतातच ना.


नाटक मोठं करा...

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर किर्ती शिलेदार यांनी नाटकांची परंपरा सांगितली. यात त्यांनी प्रामुख्याने संगीत नाट्यपरंपरेचा उल्लेख केला. संगीत नाटकं रुजवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं त्या म्हणाल्या. नाटक मोठं करण्याची गरज असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं.


राज यांच्या मताला पवारांचा दुजोरा...

नाटक मोठं करण्यासाठी बालरंगभूमीचा पाया भक्कम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन शरद पवार यांनी केलं. आजच्या बालरंगभूमीवर उद्याची प्रायोगिक रंगभूमी अवलंबून असते आणि उद्याच्या प्रायोगिक रंगभूमीवर भविष्यातील व्यावसायिक रंगभूमी अवलंबून असते, असं म्हणत पवारांनी नाटकात भव्यता यायला हवी या राज यांच्या मताला दुजोरा दिला.


राज ठाकरेंचं टायमिंग अचूक...

स्वागताध्यक्षाच्या रूपात भाषण करताना विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांचं टायमिंग भरत जाधवच्या ‘सही रे सही’ या नाटकातील टायमिंगपेक्षाही अचूक असल्याचं म्हटलं. यासोबतच पुणेरी पगडीवरून फुलेंच्या पगडीपर्यंत पोहोचण्याचं कसब शरद पवार यांच्याकडे असल्याचंही तावडे म्हणाले.हेही वाचा-

Exclusive: ४ वर्षे होतात कुठे ? लता नार्वेकरांची विनोद तावडेंवर आगपाखडसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा