अमितनं आळवला 'बाप्पा मोरया...'चा सूर

श्रावण संपून भाद्रपद सुरू होत असला की, गजाननाच्या आगमनाची चाहूल लागते. अशा वेळी गायकांनाही गणरायाची महती गाण्याचा मोह होतो आणि नवनवीन गणेश गीतांचा नजराणा सादर होतो. यंदाच्या गणेशोत्सवाचं औचित्य साधत अमित चारीनं 'बाप्पा मोरया...'चा सूर आळवला आहे.

खास अल्बम

प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेनं होते. त्यातच आता अवघ्या काही दिवसांतच बाप्पाचं आगमनही होणार आहे. हाच दुग्धशर्करा योग साधत, गायक अमित चारी गणेशोत्सवाचं वातावरण अधिकच प्रसन्न, भक्तिमय करण्यासाठी घेऊन आला आहे, 'बाप्पा मोरया' हा खास अल्बम. व्यावसायिक असलेला अमित आपली संगीत क्षेत्रातील वाटचाल बाप्पाच्या आशीर्वादानं यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला आहे. लोटस कलर्स डव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत 'बाप्पा मोरया' हा अल्बम नुकताच भाविकांच्या भेटीला आला आहे. 

पारंपारीक वाद्यांच्या तालावर 

व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाऱ्या, प्राऊड टू बी अ वूमन या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या अमितला संगीताची आवड आहे. ही आवड त्यानं 'बाप्पा मोरया' या मराठी अल्बमच्या माध्यमातून जोपासली आहे. आजच्या काळात तरुणाईला प्रादेशिक भाषांची भुरळ असतानाच अमितनं मात्र आपल्या कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी आपल्या मातृभाषेला प्राधान्य दिलं आहे. यात ढोल-ताशासारख्या पारंपारीक वाद्यांच्या तालावर गुलाल उधळत अमितनं गणरायची महती गायली आहे. गीत-संगीतरूपी आपली ही गणेशसेवा त्यानं रसिकांना अर्पण केली आहे.

आवड असेल तर सवड

या अल्बमविषयी अमित म्हणाला की, मूळात मी गायक नसून, संगीत ही माझी आवड आहे. आवड असेल तर सवड ही मिळतेच, त्यानुसार माझी गायनाची आवड मी जपत आहे. काही इतर प्रोजेक्ट्सवरही काम सुरू आहे. 'बाप्पा मोरया' विषयी सांगायचं तर या गाण्याची झी म्युझिक कंपनीनं निवड केली यातच सर्व आलं. आजपर्यंत झी कडून मराठी भक्तीगीतावर काम झालं नव्हतं. त्यामुळं मी याचा पाया रोवला, असंही म्हणता येईल. यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानतो. आजवर बॉलिवूड, पंजाबी गाण्यांमध्ये असलेली भव्यता 'बाप्पा मोरया'मध्ये सादर करण्यात आली आहे. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 

'बाप्पा मोरया'च्या तांत्रिक बाबींबाबत अमित म्हणाला की, या अल्बममध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला असून, भव्य सेट, गुलालाची उधळण, उल्हासित, उत्साही वातावरण या सर्वानेच तुम्हीही निश्चितच भारावून जाल. सिनेसृष्टीत अनेक चांगले गायक आहेत, चांगली गाणी चित्रित करण्यात आली आहेत, मात्र हे गाणंही तितकंच धमाकेदार झालं आहे. हे गाणं श्रोत्यांना नक्कीच आवडेल आणि या गणेशोत्सवात हे गाणं त्यांच्या ओठांवर सतत रेंगाळेल असा विश्वास अमितनं व्यक्त केला आहे. लवकरच संगीतातील काही नवीन प्रोजेक्ट्सच्या माध्यमातूनही तो रसिकांच्या भेटीला येणार आहे.

लिंक :  https://www.youtube.com/watch?v=-9OiNkTCIQM&feature=youtu.be


हेही वाचा  -

‘सांड की आंख’चा वेध घेणार तापसी-भूमी

महेशचं देवेंद्रला 'दबंग' गिफ्ट


पुढील बातमी
इतर बातम्या