पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच! कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांचा सूर

पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच! असा सूर मुंबईत आयोजित भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी लावला. यामुळे मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादात ठिणगी पडली आहे. यावर प्रतिक्रीया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत आमचं ठरलं असून इतर कुणीही त्यात तोंड घालू नये, असं म्हटलं आहे.  

कार्यकारिणीची बैठक

दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र प्रदेश भाजपाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत सर्वच नेत्यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असायला हवा. त्यासाठी आपण विधानसभेच्या सगळ्या जागा जिंकायला पाहिजेत. त्याची तयारी म्हणून विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघात बुथची बांधणी करायला हवी, असं भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे म्हणाल्या.

भाजपा मोठा भाऊ

तर, लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेचा मोठा भाऊ असल्याचं स्पष्ट झालं आहे. जिथं जिथं शिवसेना कमकुवत होती, तिथं भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली. येत्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ५० जागाही येणार नाहीत. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असला पाहिजे, ही सर्व कार्यकर्त्यांची भावना असल्याचं महाजन म्हणाले.

आमचं ठरलंय

यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी 'भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात युतीबाबत सगळं काही ठरलं आहे. त्यात इतर कुणी तोंड घालू नये', अशी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री कोण होणार, या प्रश्नापेक्षा गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, असंही ते म्हणाले. 


हेही वाचा-

मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाच सहाय्यतेची गरज!

डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवणार- मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या