मुख्यमंत्री वेळ देईनात, 'या' आमदारांचं मंत्रालयापुढे ठिय्या आंदोलन

औरंगाबाद दंगलप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागूनही त्यांनी भेटीची वेळ नाकारल्याने संतापलेल्या काँग्रेस, समाजवादी आणि एमआयएम इ. पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी दुपारी मंत्रालयापुढे ठिय्या आंदोलन केलं.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरून दंगल उसळली होती. या दंगलीत काही समाजकंटकांनी रात्रीच्या वेळेस मुस्लिम समाजातील जवळपास १०० व्यापाऱ्यांची दुकाने जाळली तसंच वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या प्रकाराने शहरातील दोन सामाजात जातीय दंगल घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

शिवसेनेवर आरोप?

या दंगलीत शिवसेनेचा हात असल्याचा आरोप होत असून यासंदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फुटेज घेऊन हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार आसिफ शेख, अब्दुल सत्तार, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, वारीस पठाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे वर्षा निवासस्थानी भेटीची वेळ मागितली. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटण्यास नकार दिल्याने या ४ ते ५ आमदारांनी मंत्रालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन सुरु केलं.

उशीरा दखल

या ठिय्या आंदोलनाची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यानंतर अखेर त्यांनी मंगळवारी रात्री ९ वाजता या आमदारांना भेटीची वेळ दिली. तसा निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून आल्यानंतर आमदारांनी आपलं आंदोलन स्थगित केलं.


हेही वाचा-

ओवेसींच्या सभेत भिरकावला बूट

पालघर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दाखवला बेईमानीचा आरसा


पुढील बातमी
इतर बातम्या