'बविआ'चा गनिमी कावा!

शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची बनवलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी थांबली. प्रचारामध्ये शिवसेना आणि भाजपाने 'आघाडी' घेतली असली, तरी या निवडणुकीच्या आखाड्यात अशीही एक 'आघाडी' आहे, जिने उचल खाल्ली, तर शिवसेना आणि भाजपा अशा दोन्ही पक्षांच्या रणनितीची 'बिघाडी' होऊ शकते. या पक्षाचं नाव आहे, बहुजन विकास आघाडी.

कुठलाही बागुलबुवा न करता बहुजन विकास आघाडी गनिमी काव्याने ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाच्या मतांच्या काटछाटीत 'बविआ'ची शिटी वाजली, तर दोन्ही पक्षांना पळता भुई थोडी होईल.

भाजपाला 'असा'ही फायदा

पालघर लोकसभा पोटनिवडणूक येत्या सोमवारी २८ मे रोजी होत आहे. या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी थांबली असून मतदारांना कशाप्रकारे बाहेर काढायचं याची रणनिती आता सर्वच पक्षांकडून आखली जात आहे. वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाचं वर्चस्व आहे.

हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि विलास तरे हे तिघेही या पक्षाचे आमदार असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेच्यावेळेस 'बविआ'ने सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत 'बविआ'चा खासदार निवडून आला तरी त्याचा आपल्याला पाठिंबा मिळेल अशी सुखद भावना भाजपाला खूश करत आहे.

मतदार अनुत्साही?

अवघ्या एका वर्षाँच्या कालावधीसाठी होऊ घातलेल्या या पोटनिवडणुकीला खुद्द मतदारांचाच विरोध होता. परंतु त्यानंतरही ही निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांमध्ये उत्साह असला तरी मतदारांमध्ये तेवढा उत्साह दिसून येत नाही. शिवसेनेच्यावतीने दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा, काँग्रेसच्यावतीने दामोदर(दामू) शिंगडा आणि बहुजन विकास आघाडीच्यावतीने बळीराम जाधव या तिघांमध्ये प्रमुख लढत होत आहे.

'बविआ' हा प्रचारात मागे

खासदाराच्या मुलाला शिवसेनेने पक्षात घेऊन भाजपाच्या मर्मावरच घाव घातला आहे. त्यामुळे भाजपानेही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ देत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभाही इथं झाली आहे. भाजपाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे येथील मूळ पक्ष असलेला 'बविआ' हा प्रचारात मागे पडला आहे.

कुणाचं, कुठे वजन?

पालघर, डहाणूमध्ये भाजपाचे काही प्रमाणात वजन आहे. तर नायगाव- वसई-नालासोपारा व विरार पट्ट्यांसह 'बविआ'चं प्राबल्य आहे. मागे झालेल्या महापालिका निवडणुकीत हाताच्या बोटावरच शिवसेना आणि भाजपाचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत जी रणनिती आखली होती, त्याचप्रमाणे 'बविआ' अगदी शांतप्रमाणे प्रचार करत मतदानाची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे.

मतं फोडण्याचा प्रयत्न

बोईसरमध्येही 'बविआ'चं वर्चस्व असून उर्वरीत पालघर जिल्ह्यातील भागात सर्वच पक्षांची मते विभागली गेली आहेत. याठिकाणची आदीवासींची मते हीच महत्वाची आहे. त्यामुळे शिवसेनेचे तेवढे वर्चस्व नसलं तरी श्रीनिवास वनगा यांच्यासाठी आदिवासी लोकांची मतेही सेनेच्या पारड्यात पडणारी आहे. तर हीच मतं फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. त्यामुळे मतांच्या या खेचाखेचीत हितेंद्र ठाकूर यांच्या 'बविआ'ची शिटी वाजण्याची शक्यता आहे.

भाजपासाठी उजळणी परीक्षा

काँग्रेसमधून भाजपात घेत उमेदवारी दिलेल्या राजेंद्र गावित निवडून आले किंवा नाही हा मुद्दा नसून आगामी लोकसभा निवडणुकीची उजळणी परीक्षा म्हणून भाजपा या निवडणुकीकडे बघत आहे. त्यामुळेच ही निवडणूक जिंकली तर आगामी लोकसभा निवडणुकीला मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल, हेच भाजपाचे उदिष्ट्य आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनाही साम, दाम, दंड, भेद या कुटनितीचा अवलंब करण्याची भाषा करावी लागत आहे.

तरीही 'बविआ' शांत

पालघर जिल्ह्यात बहुजनांचा विकास हाच ध्यास म्हणणाऱ्या बहुजन विकास आघाडी पक्षांच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी कुत्रे म्हणून संबोधले, तर उद्धव ठाकरे यांनी आपण प्राण्याचे नाव घेणार नाही. परंतु निवडून आल्यावर कुत्र्यासारखे सरकारच्या पाठी पाठी जावू नये असे सांगत या भागातील गुंडगिरी संपवून टाकू, असा शब्दांत टीका केली. परंतु या दोन्ही नेत्यांच्या टिकांना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उत्तर दिलं नसून शांत राहून मतपेटींतूनच या टीकेला उत्तर देण्याचा निर्धार त्यांनी केल्याचं दिसून येत आहे.


हेही वाचा-

'हो ती क्लिप माझीच, पण...' - मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर पलटवार!

शिवसेना-मनसेच्या युतीसाठी कार्यकर्त्याचा स्टंट


पुढील बातमी
इतर बातम्या