Advertisement

'हो ती क्लिप माझीच, पण...' - मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर पलटवार!

'उद्धव ठाकरे यांनी एेकवलेली ही क्लिप अर्धवट अाहे, ही क्लिप अापलीच असून ती एडिट करून एेकवण्यात आल्याचा' खुलासा शनिवारी वसईत कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

'हो ती क्लिप माझीच, पण...' - मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर पलटवार!
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक आॅडिओ क्लिप एेकवली. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड आणि भेदाची भाषा केली आणि एकच खळबळ उडाली. या क्लिपवर अखेर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी मौन सोडत, 'हो, ती माझीच क्लिप आहे, पण ही क्लिप अर्धवट असून त्यात काटछाट करून क्लिप एेकवण्यात आल्याचं' सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

पालघर पोटनिवडणुक चांगलीच रंगात आली असून प्रचाराचा जोरदार धुराळा भाजपा आणि शिवसेनेकडून उडवला जात आहे. त्यातूनच भाजपा-शिवसेनेत रोज सामना रंगत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच शुक्रवारी जाहीर सभेत शिवसेनेनं थेट मुख्यमंत्र्यांची आॅडिओ क्लिप एेकवत खळबळ उडवून दिली आहे.

'जशास तसं उत्तर देऊ'

या क्लिपमध्ये मुख्यमंत्री 'जशास तसं उत्तर द्यायचं, चिंता करू नका, आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी सक्षम आहोत, कुणाची दादगिरी चालू देणार नाही' अशी वक्तव्य करत होते. पण 'उद्धव ठाकरे यांनी एेकवलेली ही क्लिप अर्धवट अाहे, ही क्लिप अापलीच असून ती एडिट करून एेकवण्यात आल्याचा' खुलासा शनिवारी वसईत कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तर अशी क्लिप एडिट करून ऐकवणाऱ्यांविरोधातच कारवाईची मागणी करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेलाच आता धारेवर धरलं आहे.

'साम, दाम, दंड आणि भेद असा उल्लेख आपण केला होता. पण तो कूटनीती या अर्थानं होता. तर आपण सत्तेत आहोत, सत्तेचा कधीही दुरोपयोग करणार नाही असंही शेवटी म्हटलं होतं. पण पराभव समोर दिसू लागलेल्या शिवसेनेनं या पातळीवर उतरत एडिटेड क्लिप दाखवली आहे. माझ्याकडे संपूर्ण क्लिप असून ही क्लिप मीच निडवणूक आयोगाकडे सादर करणार आहे. यात काही आक्षेपार्ह आढळल्यास आयोगानं माझ्यावर कारवाई करावी.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आदेश बांदेकर यांनाही घेतलं फैलावर

शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांची जी क्लिप एेकवण्यात आली होती ती शिवसेनेचे नेते, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेते आंदेश बांदेकर यांच्याकडून आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच बांदेकरांनाही फैलावर घेतलं आहे. 'अरे मित्रा, तू सिद्धिविनायकचा अध्यक्ष आहेस. तेव्हा जनाची नाही तर मनाची तरी ठेव. अध्यक्ष असेपर्यंत तरी खोटं नाही खरं दाखव,' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बांदेकरांवर निशाणा साधला आहे. 'आदेश छोटा माणूस आहे, आदेशानेच काम करतो' असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा